फिलीपीन्सच्या मासबेट भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे झालेल्या वित्त अथवा जीवितहानीबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच त्सुनामीचा कोणताही इशारा मिळालेला नाही. अलिकडेच टर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपात ४१,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल (बुधवार) न्यूझीलंडमध्ये देखील ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता.
गेल्या महिन्यातही फिलीपीन्समध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. तेव्हा भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्टर स्केल इतकी होती. फिलीपीन्सच्या मास्बेट भागात भूकंप आल्याचे यूएसजीएसने सांगितले.
हे ही वाचा >> डीएमके नगरसेवकाच्या मारहाणीत भारतीय जवानाचा मृत्यू, ६ जणांना अटक, नगरसेवक फरार
टर्कीतल्या भूकंपात ४१,००० लोकांचा मृत्यू
दरम्यान गेल्या आठवड्यात अग्नेय टर्की आणि वायव्य सीरियात ७.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाने मोठा विध्वंस केला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत ४१,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड देश हा एकाच वेळी भूकंप आणि चक्रीवादळाच्या तडाख्याने हादरला आहे.