Massive Federal Layoffs: अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर अनेक उलथापालथी पाहायला मिळत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. शुक्रवारी ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार एलॉन मस्क यांनी एका दिवसात ९,५०० सरकारी कर्मचाऱ्यांना घरी बसविण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार युनायटेड स्टेट्समधील सरकारी जमिनींचे व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य आणि मानवी सेवा अशा विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यातील बहुतेक कर्मचारी हे प्रोबेशन पीरियडमध्ये होते. बहुसंख्या कर्मचाऱ्यांना नोकरीवर रुजू होऊन एक वर्षही झाला नव्हता.
फक्त कर्मचारी कपातच नाही तर अनेक सरकारी एजन्सींनाही ट्रम्प यांनी टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. कन्झ्यूमर फायनान्शियल प्रोटेक्शन ब्युरोचा यात समावेश आहे. याशिवाय अंतर्गत महसूल सेवा विभागातील हजारो कर्मचाऱ्यांना कमी करण्याची तयारी सुरू आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार महसूल विभागातूनही १५ एप्रिलच्या आधी मोठी कर्मचारी कपात केले जाण्याची शक्यता आहे.
व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध करण्यासाठी ७५ हजार कर्मचाऱ्यांनी स्वतःहून नोकरी सोडली आहे. अमेरिकेतील सरकारी नोकरदारांची एकूण संख्या २३ लाख असल्याचे कळते. यातील तीन टक्के कर्मचाऱ्यांनी स्वतःहून नोकरी सोडली आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकन सरकार पैशांची उधळपट्टी करत आहे. त्याशिवाय देशावर कर्जाचा बोजा वाढत आहे. अमेरिकेवर ३६ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे. तर मागच्या वर्षी राजकोषीय तूट १.८ ट्रिलियन डॉलर्स एवढा होता. या परिस्थितीमुळे सरकारच्या कारभारात काही सुधारणा करणे गरजेचे आहे. ट्रम्प यांनी मस्क यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशिएन्सीचा प्रमुख बनविले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा निर्णय त्यांच्या हाती आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे, त्यांनी आता आपली नाराजी उघड केली आहे. आमच्याबरोबर दगा झाला, असे काही कर्मचारी बोलत आहेत. ज्यांनी लष्करात सेवा दिली होती, ते लोक USDA विभागात काम करत होते. त्यांना अचानक काढून टाकण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे म्हणणे आहे की, मोठ्या व्यापाऱ्यांना फायदा मिळावा, यासाठी ट्रम्प आणि मस्क जाणूनबुजून सरकारी विभाग खिळखिळा करत आहेत.