गाझा पट्टीतील निर्वासितांच्या छावणीतील एका इमारतीला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे. ‘बीबीसी’नं या घटनेचं वृत्त दिलं आहे. उत्तर गाझामधील दाट लोकवस्तीच्या जबालिया निर्वासितांच्या छावणीत ही आग लागली होती. चार मजली इमारतीच्या वरच्या माळ्याला लागलेल्या आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवण्यात आले.
या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल साठवण्यात आले होते. या पेट्रोलचा भडका उडाल्यानं ही आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. या इमारतीतील सर्व रहिवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझा सरकारने दिली आहे. इमारतीला आग लागल्यानंतर पीडितांच्या हतबल नातेवाईकांकडून मदतीची याचना करण्यात येत होती. मात्र, इमारतीत जळणाऱ्या स्त्रिया आणि लहान मुलांना वाचवण्याची शक्यता धुसर होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने ‘बीबीसी’ला दिली आहे.
रशियाचे युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच चौघांचा मृत्यू; विजेचे संकट कायम
पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी या घटनेला राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. एक दिवसाचा शोकही गाझा पट्टीत जाहीर करण्यात आला आहे. जबालिया गाझामधील आठ निर्वासितांच्या छावण्यांपैकी एक आहे. या ठिकाणी २.३ दशलक्ष लोक राहतात. ही वस्ती जगातील सर्वात दाट लोकवस्तीच्या भागांपैकी एक आहे. गाझामधील बहुतांश कुटुंबांकडून जनरेटरसाठी पेट्रोल आणि डिझेलची साठवणूक केली जाते. या भागात विजेचं एकच केंद्र असून दिवसातील केवळ आठ तास वीज उपलब्ध असते.