केदारनाथ यात्रा मार्गावरली गौरीकुंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले आहेत. तर दुकानंही मंदाकिनी नदीत वाहून गेली आहेत असं समजतं आहे. उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग या ठिकाणी पूर आल्याने आणि दरड कोसळल्याने १३ लोक बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी रात्री प्रचंड पाऊस पडला. त्यानंतर या ठिकाणी असलेली तीन दुकानंही वाहून मंदाकिनी नदीत गेली असंही सांगण्यात येतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केदारनाथ यात्रा मार्गावर असलेल्या गौरीकुंड या ठिकाणी ही घटना घडली आहे. जिल्हा कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार १३ लोक बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी १२ लोकांची ओळख पटली आहे. या १२ जणांमध्ये ३ वर्षे ते १४ वर्षांच्या वयातील पाच मुलांचाही समावेश आहे. रात्री उशिरा या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आललं आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक आत्ता आहेत. SDRF ने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत १३ जण बेपत्ता आहेत यामध्ये नेपाळी आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी विमल रावत यांनी सांगितलं की प्रचंड पाऊस पडत असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. तसंच काही भागांमध्ये दरड काही ठराविक अंतराने कोसळते आहे त्यामुळेही बचाव कार्यात अडथळे येत आहेत. मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदीला पूर आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी दलीप सिंह रजवार यांनी सांगितलं की जिल्हा प्रशासनाची टीम, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस, SDRF, NDRF ही सगळी पथकं घटनास्थळी उपस्थित आहेत. डोंगराचा भाग कोसळल्याने तीन दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. जे १० ते १२ लोक या ठिकाणी होते त्यांचाही शोध सुरु आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive landslide near gaurikund on kedarnath yatra route several feared buried shops washed away scj