आर्थिक पेचप्रसंग, फेफऱ्यास कारण ठरणारे मेंदूतील बदल हे गणिती समीकरणाच्या मदतीने आधीच सांगता येऊ शकतात भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह काही संशोधकांनी असे समीकरण तयार केले आहे.
जर वास्तव जगातील इतर गुंतागुंतीच्या प्रणालींचा विचार केला जसे हवामान बदल, रोग नियंत्रण यातही या समीकरणाचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे अशा दुर्घटना होण्याआधीच त्या टाळण्याचा मार्ग या गणिती समीकरणाच्या मदतीने शक्य झाला आहे, असा दावा आहे.
ससेक्स विद्यापीठातील वैज्ञानिकांनी गणित, संगणकीय सादृशीकरणाच्या मदतीने हे संशोधन केले असून त्यात माहितीचा प्रवाह हा योग्य स्थिती (हेल्दी स्टेट) पासून वाईट स्थितीकडे (अनहेल्दी स्टेट) वळण्याच्या अगोदर एका परमोच्च बिंदूला पोहोचलेला दिसतो. अनेक वास्तव यंत्रणा किंवा घटनांमध्ये अशा प्रकारचे अवस्थांतरण असते , फेफेरे येते तेव्हा मेंदूत घडणाऱ्या क्रिया, आर्थिक बाजारपेठांचे कोसळणे ही अशा घटनांची दोन उदाहरणे झाली. आतापर्यंत अशा दुर्घटनांचा अंदाज बांधण्याचा कुठलाही मार्ग नव्हता असा संशोधकांचा दावा आहे. यापूर्वी जी काही साधने अंदाज व्यक्त करण्यासाठी उपलब्ध होती त्यात अचूकता नव्हती. मेंदूचे गुंतागुंतीचे कार्य व अर्थव्यवस्थेतील गुंतागुंत हे सगळे काही घटक एकमेकांवर कसा परिणाम करतात यावर अवलंबून असतात व त्याच्याआधारे आपण होणाऱ्या दुर्घटनेचा अंदाज बांधू शकतो. थोडक्यात माहितीचे वहन कसे होते हे सांगता येते. या माहितीच्या वहनाच्या वेगाचा एकंदरीत अंदाज घेतला व त्यात स्थानिक परिमाण दिले नाही तरच असे अंदाज करता येतात असे डॉ. लायनेल बारनेट यांनी सांगितले. एखाद्या गुंतागुंतीच्या यंत्रणेच्या भागांचे स्वतंत्ररीत्या व एकात्मरीत्या गुणधर्म ठरवता आले, तर आपल्याला अवस्थांतरांचे भाकित करता येते असे संशोधकांचे म्हणणे आहे.
सॅकलेर सेंटरचे सह संचालक प्रा. अनिल सेठ यांच्या मते या संशोधनाचे परिणाम दूरगामी आहेत. जर या निष्कर्षांचे वास्तव जगातील यंत्रणांच्या दृष्टीने सामान्यीकरण करता येत असेल किंवा ते लागू करता येत असतील तर काही दुर्घटना घडण्यापूर्वीच कळून त्यात वेळीच हस्तक्षेप शक्य असतो. जर एखाद्या व्यक्तीला फेफरे येणार असेल व वेळीच वैद्यकीय मदत मिळाली तर पुढचे सगळे टळू शकते. आर्थिक बाजारपेठा, जागतिक हवामान प्रणाली, प्रतिकारशक्ती यंत्रणा यातील संभाव्य बिघाडांच्या आधीच आपण हस्तक्षेप करू शकतो. जर्नल फिजीक्स रिव्ह्य़ू लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mathematical equation helps predict calamities financial crashes or epilepsy seizures
Show comments