अलिबाग : आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर माथेरानकरांनी बेमुदत बंदचा निर्णय मागे घेतला आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे वाढते फसवणुकीचे प्रकार रोखण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती.
या बंदला माथेरानमधील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, ई रिक्षा संघटना, हात रिक्षा संघटना आणि हॉटेल आणि व्यापारी असोसिएशन यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे गेले दोन दिवस माथेरानमध्ये बंद पाळण्यात आला. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी बुधवारी एक बैठक घेतली. माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर दस्तुरीनाका येथे पर्यटन सुविधा केंद्र सुरू करणे, वाहनतळ, दस्तुरीनाका परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रिक्षा आणि इतर दरपत्रक लावणे, पर्यटकांसाठी सूचना फलक बसविणे, माथेरानमध्ये प्रवेशासाठी एकच प्रवेशमार्ग निश्चित करणे आणि पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी पाऊले उचलण्याचे निश्चित करण्यात आले. समन्वयासाठी एका समितीची स्थापन करण्याचेही निश्चित करण्यात आले.
अहवाल देण्याचे निर्देश
नवी दिल्ली : माथेरानमधील जमिनीची धूप थोपवण्यासाठी तेथील रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवणे आवश्यक आहे का यासंबंधी अहवाल दाखल करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे’ला (नीरी) बुधवारी दिले.