Mathura News : उत्तर प्रदेशातील मथुरा या ठिकाणी एका तरुणाने असं काही कृत्य केलं की ते पाहून डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसला. एक तरुण पोटदुखीने त्रस्त होता. त्या तरुणाने चक्क यूट्यूबवर व्हिडीओ पाहून स्वत:च ऑपरेशन केलं. एवढंच नाही तर ऑपरेशनसाठी लागणारं साहित्य इंजेक्शन, ब्लेड आणि इतर वस्तू मेडिकलमधून खरेदी केल्या, त्यानंतर स्वत:च स्वत:च्या पोटाची शस्त्रक्रिया केली. तसेच शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्या पोटाला ११ टाकेही त्यानेच टाकले. राजा बाबू असं या तरुणाचं नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
नेमकं घटना काय घडली?
मथुरा येथील एका तरुणाच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. त्यानंतर या तरुणाने युट्यूबवर काही व्हिडीओ पाहिले आणि स्वतःवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पोटात तीव्र वेदना होत असताना त्याने काही डॉक्टरांचा सल्लाही घेतला होता. मात्र, तरीही त्याला काही फरक पडला नाही. त्यानंतर त्याने पोटाची शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्याने एका मेडिकल स्टोअरमधून काही औषधे खरेदी केले. यामध्ये शस्त्रक्रियासाठी लागणाऱ्या गोष्टी होत्या. शस्त्रक्रियासाठी लागणारे साहित्य आणले आणि नंतर त्याने युट्यूबवर व्हिडीओ पाहून स्वतःवर स्वतःच शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली. यानंतर त्या तरुणाला कुटुंबाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. राजा बाबूच्या मते त्याला वेदना असह्य झाल्याने त्याने हे कृत्य केलं. शस्त्रक्रिया करताना त्याने भूल घेतली होती, त्यामुळे त्याला आधी जास्त त्रास जाणवला नाही. पण काही वेळाने भूल कमी झाल्यावर त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तो जोरात ओरडू लागला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीय देखील स्तब्ध झालं. पण त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं. हा सर्व प्रकार पाहून डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसला.
दरम्यान, घटनेची पुष्टी करताना इंडिया टुडेशी बोलताना त्याच्या कुटुबीयांनी सांगितलं की यूट्यूब व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने स्वतःवर शस्त्रक्रिया केली. गेल्या काही दिवसांपासून त्याला पोटदुखीचा त्रास होत होता आणि अनेक डॉक्टरांकडे उपचार घेऊनही त्याला आराम मिळत नव्हता. त्यामुळे त्याने हा प्रकार केला.