नागरिक करोनाच्या नियमांचं पालन करत नाहीत, मास्क परिधान करत नाहीत याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. करोना प्रतिबंधक नियमांचं पालन नागरिक करत नाहीत ही चिंतेची बाब असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच उत्तर भारतातल्या काही प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी पर्यटकांनी कोणत्याही करोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं नाही. याचे अनेक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत. यावरुनच पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोना परिस्थितीसंदर्भात बोलत होते.

हेही वाचा – मोठी बातमी! सप्टेंबरपासून सिरम इन्स्टिट्युट Sputnik V लसीचंही उत्पादन करणार!

त्यांनी काही राज्यांमधल्या करोना परिस्थितीबद्दल काळजीही व्यक्त केली आहे. काही जिल्ह्यांची परिस्थिती फारच चिंताजनक असल्याचंही ते म्हटले आहेत. पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अधिक चौकस राहण्याची सूचना केली असून करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अधिकाधिक उपाय करण्याचं आवाहनही केलं आहे. ते म्हणाले, “करोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. आपल्याला काही कठोर पावलं उचलावी लागतील. सूक्ष्म पातळीवर जाऊन काम करावं लागेल. आपल्याला करोनाच्या नवनव्या व्हेरिएंट्सकडे लक्ष ठेवायला हवं. शास्त्रज्ञ सध्या त्यांचा अभ्यास करत आहेत. आपल्याला जनतेला करोना प्रतिबंधाचे नियम पाळण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं”.

आणखी वाचा – Coronavirus: दिलासादायक! देशात गेल्या ११८ दिवसांतली सर्वात कमी नवबाधितांची नोंद

“लोक मास्क परिधान न करताच पर्यटनस्थळी, बाजारात जात आहेत हे खरंच चिंताजनक आहे”, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांशी बोलताना पंतप्रधान म्हणाले, “आपल्याला करोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर लसीकरणावर जास्तीत जास्त भर द्यायला हवा. लसीकरणाचा वेग वाढवायला हवा”. उत्तरेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या बैठकीत आसाम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरम या राज्यांचे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हे देखील उपस्थित होते.