अबू धाबीमध्ये पोलिसांनी रस्त्यावर नमाज पठणावर बंदी घातली आहे. जर कुणी रस्त्यावर नमाज पठण करताना आढळलं तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दोषींना एक हजार दिरहमचा आर्थिक दंडही केला जाणार आहे. अबू धाबूतील या निर्णयावर बोलताना उत्तर प्रदेशमधील मोरादाबादचे मौलाना आणि सूफी इस्लामिक बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते कशिश वारसी यांनी मुस्लीम कट्टरतावाद्यांना सवाल केला आहे.

कशिश वारसी म्हणाले, “मुस्लीम देशांमध्येही नमाज पठणाबाबत नवे नियम बनवले जात आहेत. ते नियम प्रशंसनीय आहेत. कारण इस्लाम धर्म कोणत्याही रस्त्यावर येऊन नमाज पठण करण्यास सांगत नाही.”

“अबू धाबीत भाजपाचं सरकार नाही”

“अबू धाबीत भाजपाचं सरकार नाही. जर नमाज पठणाबाबत असाच नियम भारतात झाला असता तर कट्टरतावाद्यांनी आतापर्यंत गोंधळ घातला असता. मात्र, हा नियम अबू धाबीसारख्या मुस्लीम देशात करण्यात आला. त्यामुळे कट्टरतावादी काहीही बोलत नाहीत. अबू धाबीच्या सरकारने लोकांना मुस्लीम धर्माची योग्य माहिती दिली. त्यामुळे मी खूप आनंदी आहे,” असंही कशिश वारसी यांनी नमूद केलं.

“मुस्लीम धर्म रस्ता अडवून नमाज करायला सांगत नाही”

वारसी पुढे म्हणाले, “मुस्लीम धर्म कुणाचा रस्ता अडवून नमाज पठण करायला सांगत नाही. जर कुणाला नमाज पठण करायचे असेल तर त्याने घरात, मशिदीत करावं किंवा अशा ठिकाणी करावं जिथं इतरांच्या येण्याजाण्याचा मार्ग अडवला जाऊ नये. तुम्ही नमाज पठण करत असाल तर इतर कोणत्याही व्यक्तीला त्याचा त्रास होता कामा नये. मुस्लीम धर्म म्हणजे इतरांना त्रास देणं नाही.”

हेही वाचा : भाजपा मुस्लिमांना ‘मोदी मित्र’ प्रमाणपत्राने गौरविणार; ६५ लोकसभा मतदारसंघात ५० हजार मुस्लीम हितचिंतक तयार करणार

“मुस्लीम धर्म कुणालाही त्रास देत नाही”

“अबू धाबू सरकारने संपूर्ण जगाला संदेश दिला आहे की, मुस्लीम धर्म कुणालाही त्रास देत नाही. मुस्लीम धर्म सर्वांना प्रेम आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आहे,” असंही वारसी यांनी नमूद केलं.

Story img Loader