PM Modi To Get Mauritius’s Highest Honour: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. दरम्यान मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ देण्याची घोषणा केली आहे. मॉरिशसचा हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत.
पोर्ट लुईस येथे झालेल्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच रामगुलाम यांनी ही घोषणा केली. यानंतर मॉरिशसच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी रामगुलाम यांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, त्यांनी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांचा निर्णय नम्रतेने स्वीकारला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींना आतापर्यंत विविध देशांकडून २१ पुरस्कार मिळाले आहेत.
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मॉरिशसच्या पंतप्रधानांनी नुकतेच जाहीर केले की, ते मला त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. मी त्यांचा निर्णय नम्रतेने स्वीकारू इच्छितो. हा भारत आणि मॉरिशसच्या ऐतिहासिक संबंधांचा सन्मान आहे.”
मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी सांगितले की, १२ मार्च १९९२ रोजी मॉरिशस प्रजासत्ताक झाल्यापासून पाच परदेशी मान्यवरांना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान १९९८ मध्ये नेल्सन मंडेला हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी बार्बाडोस, गयाना, रशिया, भूतान, फ्रान्स, इजिप्त आणि अमेरिका या देशांकडून सर्वोच्च सन्मान मिळाला आहे.
पंतप्रधानांचा मॉरिशस दौरा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते पोर्ट लुईस येथे पोहोचले. उद्या, १२ मार्च रोजी होणाऱ्या मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात भारतीय नौदलाच्या जहाजासह भारतीय संरक्षण दलांची एक तुकडीही सहभागी होणार आहे.