लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. खुद्द सुरेखा पुणेकर यांनीच यासंदर्भातले संकेत दिले आहेत. पुण्यातून भाजपाने गिरीश बापट यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या विरोधात कुणाला उभे करायचे यासंदर्भातला घोळ अद्याप संपलेला नाही. त्यामुळे या जागेवरून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नावाचा विचार होत असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने लोकसभेसाठी सुरेखा पुणेकर यांना तिकिट दिल्यास पुण्यात सुरेखा पुणेकर विरूद्ध गिरीश बापट असा सामान रंगण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सुरेखा पुणेकर यांनीच हा खुलासा केला आहे. दिल्लीत जाऊन मी काँग्रेसच्या नेत्यांशी बोलले आहे. ते मला त्यांचा निर्णय कळवणार आहे. मी कुणाला भेटले ते काही सांगणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान कालपर्यंत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा होती. आता मात्र सुरेखा पुणेकर पुण्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव काँग्रेसने निश्चित केलंय पण त्याच्या नावाची अधिकृत घोषणा अजुन झालेली नाही. गेली काही दिवस काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच चर्चा सुरू होती. दिल्लीतल्या श्रेष्ठींनी आपलं मत शिंदे यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांची उमेदवारी पक्की झाली अशी माहिती सूत्रांनी दिली होती.

दिल्लीतून दोन निरिक्षक पाठवून काँग्रेसने अंतर्गत सर्व्हेही केला होता. त्यानंतर अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रवीण गायकवाड या तिघांची नावे दिल्लीत पाठविण्यात आली होती. मात्र आता सुरेखा पुणेकर यांचं नाव समोर आल्याने रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान भाजपाने पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी दिली त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रचार जोरकसपणे सुरु केला आहे. आता सुरेखा पुणेकर यांना तिकिट दिल्यास पुण्यात गिरीश बापट विरूद्ध सुरेखा पुणेकर असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: May surekha punekar will be congress candidate from pune for lok sabha polls