Amazon Manger Murder : दिल्लीत काही दिवसांपूर्वी अॅमेझॉनच्या एका सीनियर मॅनेजरची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली. यामध्ये एक १८ वर्षांचा मुलगा आहे. ज्याचं नाव समीर उर्फ माया असं आहे. हा मुलगाच माया गँग चालवतो. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर लिहिलं आहे नाव-बदनाम, पत्ता-कबरीस्तान, उम्र-जीने की, शौक मरने का असं लिहिलं आहे. इंस्टाग्रामवर त्याचे २०९२ फॉलोअर्स आहेत. शूट आऊट अॅट लोखंडवाला या सिनेमाचा त्याच्यावर प्रभाव आहे. यातल्या कॅरेक्टवरुनच त्याने स्वतःचं नाव माया असं ठेवलं आहे.
उत्तर पूर्वी दिल्लीत नवी टोळी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर पूर्व दिल्ली भागात छैनू, नासिर आणि हाशिम बाबा यांच्यासारखे गँग आहेत तिथे आता नवी गँग आली आहे. ही गँग आहे माया गँग. इंस्टाग्राम प्रोफाईलवर पिस्तुल घेऊन त्याने अनेक फोटो पोस्ट केले आहेत. अॅमेझॉनचा मॅनेजर हरप्रीत गिल आणि त्याचे काका गोविंद या दोघांवर गोळीबार केला. या प्रकरणात समीर उर्फ मायाला पोलिसांनी अटक केली आहे. तो या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. या प्रकरणातला दुसरा आरोपी आहे बिलाल गनी, रविवारी तो १८ वर्षांचा झाला आहे. पोलिसांनी हे देखील सांगितलं आहे की गनी हा गेल्या वर्षीही एका हत्या प्रकरणात आणि दरोड्याच्या प्रकरणात सहभागी होता. त्यावेळी त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली होती. मात्र बालसुधार गृहातून बाहेर आल्यावर तो एका वेल्डिंगच्या दुकानात काम करत होता.
अॅमेझॉनच्या मॅनेजरची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास हरप्रीत आणि गोविंद हे दोघे बाईकवरुन चालले होते. त्यावेळी एका गल्लीतून माया, गनी, सोहेल, मोहम्मद जुनैद आणि अदनान हे सगळे दोन स्कुटरवरुन चालले होते. त्यावेळी एके ठिकाणी हरप्रीत आणि हे सगळे आमनेसामने आले. पुढे जायला रस्ता कोण देणार या वादातून वादा सुरु झाला. नंतर मारामारी झाली. त्यानंतर मायाने हरप्रीत आणि गोविंद दोघांवर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना या घटनेचा शोध लागला. त्यानंतर समीर आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केली. या प्रकरणात अॅमेझॉनचा मॅनेजर हरप्रीतचा जागीच मृत्यू झाला तर गोविंद हा रुग्णालयात उपचार घेतो आहे.