बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आज (१५ जानेवारी) त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. बसपा इंडिया आघाडीत सहभागी होणार का? या प्रश्नाचं उत्तर या पत्रकार परिषदेतून मिळेल अशी सर्वांना आशा होती. त्याप्रमाणे मायावती यांनी इंडिया आघाडीबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची त्यांची रणनीति जाहीर केली. यावेळी मायावती यांनी भाजपा, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीवर हल्लाबोल करत आगामी निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

इंडिया आघाडीची नुकतीच नवी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बसपाला आघाडीत घेण्याबाबत चर्चा झाली होती. परंतु, त्यावेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यास विरोध केला. यादव म्हणाले, जर मायावतींचा पक्ष आघाडीत आला तर आम्हाला आमच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा लागेल. यादव यांनी आघाडीत बाहेर पडण्याची तयारी दर्शवली. अखिलेश यादव यांच्या या भूमिकेमुळे मायावती त्यांच्यावर संतापल्या आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत मायावती यांनी सर्वप्रथम अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. मायावती अखिलेश यादव यांना रंग बलदणारा सरडा म्हणाल्या. तसेच त्यांनी भाजपा, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना भांडवलदार, सरंजाम आणि जातीयवादी म्हटलं. मायावती म्हणाल्या, हे पक्ष दलितांना त्यांच्या पायावर उभं राहिलेलं पाहू इच्छित नाहीत. यांच्यामुळेचं लोकांना आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळत नाही.

मायावती म्हणाल्या, हे सगळे पक्ष साम-दाम-दंड-भेद या सूत्राचा अवलंब करून दलितांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वांनी या पक्षांपासून सावध राहावं आणि समाजातील प्रत्येक घटकाने बसपाबरोबर यावं. सपा प्रमुखांनी इंडियाच्या बैठकीत बसपाबाबत सरड्याप्रमाणे रंग बदलला आहे. त्यामुळे त्यांच्यापासून अधिक सावथ राहावं.

इंडिया आघाडीत सहभागी होणार का? असा प्रश्न विचारल्यावर मायावती म्हणाल्या, “आम्ही (बसपा) आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. बसपा कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही.” परंतु, मायावती यांनी यावेळी निवडणुकीच्या निकालानंतरच्या युतीचा पर्याय खुला ठेवला आहे. युती न करण्याबाबत मायावती म्हणाल्या, “आपल्या पक्षाचं नेतृतव दलित हातांमध्ये आहे. त्यामुळे युतीत आमची मतं आमच्या मित्रपक्षांना मिळतात. परंतु, मित्रपक्षांची मतं आम्हाला मिळत नाहीत.” आपला मुद्दा मांडत असताना मायावती यांनी याआधी युतीत लढलेल्या निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी सांगितली. तसेच पुन्हा एकदा स्वबळावर सत्ता मिळवू असा विश्वास व्यक्त केला.

मायावती राजकारणातून निवृत्त होणार?

मायावती यांनी अलीकडेच आकाश आनंद यांना त्यांचा एकमेव राजकीय उत्तराधिकारी घोषित केलं आहे. त्यामुळे मायावती आता राजकारणातून निवृत्त होतील अशी चर्चा चालू होती. या सर्व चर्चांना मायावती यांनी आज पूर्णविराम लावला. मायावती म्हणाल्या, या केवळ खोट्या अफवा आहेत.

Story img Loader