देशातील सध्याची परिस्थिती पाहता लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगतानाच, बहुजन समाज पक्ष यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेणार नाही, असे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी रविवारी येथे स्पष्ट केले.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी देशात लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता शनिवारी फेटाळून लावली होती. त्याबाबत विचारले असता मायावती म्हणाल्या, की त्याबाबत आपण आताच काही सांगू शकत नाही. मात्र देशातील सद्यस्थिती पाहता वेळेआधी निवडणुका होऊ शकतात. आमचा पक्ष त्यासाठी सज्ज आहे.
केंद्राच्या धोरणांबाबत असमाधान व्यक्त करताना त्या म्हणाल्या, की शेतकरी, नोकरदार, गरीब आणि समाजातील अन्य वर्गावर केंद्राच्या धोरणांमुळे विपरीत परिणाम होत आहेत. परंतु असे असले तरी जातीयवादी शक्तींना रोखण्याच्या दृष्टीने आम्ही केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा देतच राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी कोणतेही भाष्य करण्याचे त्यांनी या वेळी टाळले. बसपचे संस्थापक कांशीराम यांच्या भगिनी गुरुचरण कौर यांच्या शोकसभेत सहभागी होण्यासाठी मायावती येथून नजीकच असलेल्या झिराकपूर या गावी आल्या होत्या.