बसपचे संस्थापक कांशीराम यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय दुखवटा जाहीर न करून काँग्रेस आपल्या पक्षाविरुद्ध जातीयवादी भूमिकेचा अवलंब करीत असल्याचा आरोप बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे.
मायावती यांनी उत्तर प्रदेशात अनुसूचित जातीच्या कोणत्याही नेत्याला पुढे येऊ दिले नाही, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला होता. त्यानंतर आता मायावती यांनी काँग्रेसवरच आरोप केला. मायावती म्हणाल्या की, अनेक पक्षांची, विशेषत: काँग्रेस पक्षाची कांशीराम यांच्याबाबतची भूमिका जातीयवादी होती. कांशीराम यांच्याबाबत काँग्रेस जातीयवादी असल्यानेच त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने एक दिवसाचाही दुखवटा जाहीर केला नाही. काँग्रेसची मानसिकता दलितविरोधी असल्याचा हा भक्कम पुरावा आहे, असेही मायावती म्हणाल्या.