किराणा मालातील परदेशी गुतवणुकीच्य़ा केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी आपले म्हणणे गुलदस्त्यात ठेवले असून याबाबत आम्ही आमची भूमिका लोकसभेत स्पष्ट करू, असे आज (सोमवार) पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले. एफडीआयचा देशाला होणारा फायदा आणि तोटा लक्षात घेऊन मगच निर्णय घेतला जाईल, असंही त्या म्हणाल्या. एफडीआयच्या मुद्द्यावर उद्या (मंगळवार) लोकसभेत चर्चा होणार असून, मतदानसुध्दा होण्याची शक्यता आहे.
देशाच्या विकासासाठी परदेशी गुंतवणूक आवश्यक असली तरी त्यामुळे किराणा माल विकणा-या लहान व्यापा-यांना त्याचा फटका बसणार आहे. एवढंच नव्हे तर, शेतक-यांनाही एफडीआयचा लाभ होईल असे चित्र दिसत नाही. देशातील महाईगाईच्या चढत्या आलेखाला यामुळे आळा बसेल अशीही आशा सध्या तरी दिसत नसल्यामुळे बसपा एफडीआयचे समर्थन करत नाही, असे मायावतींनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
परदेशी चलन भारतात आणण्यासाठी एफडीआय हा एकमेव मार्ग असला तरी याचे धोकेही लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे, सरकारने एफडिआयच्या परिणामांबाबत योग्य ती चर्चा करून मगच निर्णय घ्यावा, असंही मायावती पुढे म्हणाल्या.

Story img Loader