उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून समाजवादी पक्षाचे सरकार बरखास्त करा. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी राज्यपाल बी. एल. जोशी यांच्याकडे केली आहे.
अखिलेश यादव यांचे सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरले असून इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचारही बोकाळला असल्याचा आरोप करीत मायावती यांनी सरकार बरखास्तीची मागणी केली आहे. नोएडा येथे दलित मुलीवर झालेली बलात्काराची घटना पोलिसांनी प्रथम दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा प्रयत्न मीडियामुळे फसला. उत्तर प्रदेश विधानसभेला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल विचारले असता मायावती म्हणाल्या, हा कार्यक्रम सरकारी आहे की राजकीय असा प्रश्न आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader