भाजपशी दोन हात करण्यासाठी प्रतिस्पर्धी पक्षांनी हातमिळवणी करण्याचा बिहारमधील प्रयोगाचा उत्तरार्ध उत्तर प्रदेशातही होण्याची शक्यता मावळली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी सपाशी हातमिळवणी करण्याची शक्यता बसपाच्या नेत्या मायावती यांनी सपशेल फेटाळली आहे.
बसपा आणि सपा या कट्टर प्रतिस्पध्र्यानी उत्तर प्रदेशात आघाडी करावी, अशी सूचना राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली होती. मात्र सपा आणि भाजपनेच गुप्तपणे हातमिळवणी केल्याचा दावा मायावती यांनी केला आहे. बसपा स्वबळावर निवडणुका लढणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपाशी हातमिळवणी करण्याची शक्यता मायावती यांनी सपशेल फेटाळल्याने मुलायमसिंह यादव यांना चांगलाच दणका बसला आहे. बसपाशी हातमिळवणी होण्याची शक्यता मुलायमसिंह यांनीच वर्तविली होती. सपाचे सरकार जेव्हा सत्तेवर आले तेव्हा गुन्हेगारी, जातीय हिंसाचार, बलात्कार, दरोडे यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. हीच सपाची संस्कृती असून असे प्रकार घडले नाहीत तर सपा नष्ट होईल, असेही मायावती यांनी म्हटले आहे.

Story img Loader