लखनौ :बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी सांगितले की त्यांचा पक्ष समान नागरी कायदा (यूसीसी) राबविण्याच्या विरोधात नाही. परंतु भाजपप्रणित केंद्र सरकार देशात ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्याशी आपण सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समान नागरी कायद्याच्या मुद्दय़ावर मायावतींनी रविवारी येथे पत्रकारांना सांगितले की घटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये समान नागरी कायदा तयार करण्यासाठीच्या प्रक्रियेचा तपशील आहे. परंतु ते लादणे योग्य नाही. त्यामुळे या सर्व बाबी विचारात घेऊन भाजपने देशात हा कायदा लागू करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. हा कायदा वेगवेगळय़ा धर्माचे आचरण करणाऱ्या नागरिकांना लागू झाला तर देश कमकुवत होणार नाही तर मजबूतच होईल. त्या म्हणाल्या की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये समान नागरी कायदा बनविण्याचा उल्लेख आहे, हे खरे आहे. परंतु ती सक्तीने लादण्याची तरतूद नाही आणि त्यासाठी या संदर्भात व्यापक जागरुकता आणि एकमत हेच योग्य अन् श्रेष्ठतम मानले गेले आहे.