हिंदी विश्वविद्यालयाचा प्रस्ताव
भोपाळ शहरातील अटलबिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालयाने एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पेपर हिंदीतून लिहिण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल काऊन्सिलकडे (एमसीआय) केली आहे.
हिंदी विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू मोहनलाल चिप्पा म्हणाले की, एमबीबीएस पदवी परीक्षा हिंदीतून देण्याची परवानगी एमसीआयकडे मागितली आहे. वैद्यकीय पूर्व परीक्षा हिंदीतून देण्याची परवानगी असेल तर या अभ्यासक्रमाचे पेपरही हिंदीतून लिहू द्यावे अशी आमची भूमिका आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाची परीक्षा हिंदीतून देण्याची परवानगी मिळावी यासाठी २०११ पासून हिंदी विश्वविद्यालय प्रयत्नशील आहे.
एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एमसीआयकडून परवानगी का मिळत नाही, असे विचारले असता चिप्पा म्हणाले की, एमबीबीएस अभ्यासक्रमाची पुस्तके हिंदीत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे कारण एमसीआयने दिले आहे. चिप्पा म्हणाले की, एमबीबीएसच्या पुस्तकांचे हिंदीतील प्रमाण कमी असल्यामुळे आम्ही २५० ते ३०० पुस्तके जमा करताना हिंदीतून पुरेशी पुस्तके उपलब्ध असल्याचे सांगितले. उपकुलगुरू म्हणाले की, एमबीबीएस परीक्षेला हिंदीचे स्वरूप देणे शक्य नसेल तर विद्यार्थ्यांना हिंदीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही एमसीआयकडे केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स या प्रतिष्ठित संस्थेतून वैद्यकीय पदवी घेतलेले ५४ टक्के विद्यार्थी नोकरीसाठी परदेशात जातात आणि पुन्हा भारतात परतत नसल्याची माहितीही चिप्पा यांनी दिली. हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड होते, मात्र भाषेमुळे त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.