दिल्लीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापताना दिसत आहे. भाजपा आणि आम आदमी पार्टी यांच्यात सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. आता दिल्लीतील कचऱ्याच्या मुद्द्यावरून राजकारण रंगलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत गाझीपुर लँडफिल येथे जाऊन भाजपावर निशाणा साधला. १५ वर्षांमध्ये भाजपाने दिल्लीवासीयांना कचऱ्याचे मोठे डोंगर दिले, असं केजरीवाल म्हणाले आहेत. याशिवाय केजरीवाल यांनी स्वत:ला दिल्लीकरांचा ‘श्रावणकुमार’ संबोधलं आहे.
केजरीवाल म्हणाले, “मागील १५ वर्षांत भाजपाने संपूर्ण दिल्लीत कचरा-कचरा केला आहे. आजच त्यांचे गाझीपुरमधील कचऱ्यांचे डोंगर पाहून आलो आहे. सर्व दिल्लीवासीयांना माझे आवाहन आहे की यावेळ महापालिका निवडणुकीत दिल्लीच्या स्वच्छतेसाठी मत द्यायचे आहे. आपल्याला मिळून दिल्लीला स्वच्छ व सुंदर बनवायचे आहे. ”
याशिवाय “एक दिवस नक्कीच येईल की जेव्हा संबित पात्रा सुद्धा म्हणतील की भाजपा खूप वाईट पक्ष आहे आम आदमी पार्टी खूप चांगला पक्ष आहे. मी जादूगर आहे. मन कसं जिंकायचं माहीत आहे. लोकांची कामं करू, त्यांच्या सुख-दु:खात कामी येऊ, लोकांचं मन जिंकू. यांच्यासारखं(भाजपा) काळे झेंडे घेऊन नाही उभा राहणार. आम्हाला काळे झेंडे घेऊन उभा राहण्याची आवश्यकता नाही. आम्ही पुण्य कमावतो, आम्ही लोकांची मनं जिंकतो. सात वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही दिल्लीत पहिल्यांदा निवडणूक लढलो होतो, तेव्हा लोक म्हणत होते की भाजपाची एवढी मतं आहेत. परंतु आम्ही हळूहळू सर्वांची मनं जिंकली. काँग्रेस तर शून्य झाली आणि तो दिवसही दूर नाही जेव्हा भाजपाही दिल्लीमध्ये शून्य झालेली असेल. ” असंही केजरीवाल यांनी यावेळी म्हटलं.
याचबरोबर “मी दिल्लीच्या जनतेला विचारू इच्छितो, दिल्लीच्या माता-भगिनींना विचारू इच्छतो की, तुमच्या कुटुंबातील मुलांसाठी मी शाळा बनवल्या, शिक्षणाची व्यवस्था केली. आज तुमच्या मुलाला ते(भाजपा) शिव्या देत आहेत, तुम्ही सहन करणार का? मी दिल्लीच्या ज्येष्ठ नागरिकांना विचारू इच्छतो की, तुमचा श्रावणकुमार बनून तुम्हाला मी तीर्थयात्रा घडवली होती. आज हे तुमच्या मुलाला शिव्या देत आहेत. मी दिल्लीच्या माता-भगिनी आणि ज्येष्ठांना विचारू इच्छितो की तुम्ही हे सहन करणार का? यंदा दिवाळीच्या स्वच्छतेवर निवडणूक होईल. दिल्लीच्या दोन कोटी लोकांना एकत्र यायचं आहे. सर्वजण एकत्र या आणि जेवढे भाजपावाले आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जायचं आणि त्यांचं मन जिंकायचं आहे. त्यांच्याशी भांडायचं नाही. दिल्लीत एकही भाजपावाला राहणार नाही सर्वांचं मन जिंकू. प्रत्येकाचं मन जिंकायचं आहे. भांडायचं नाही, सर्वांना हेच सांगायचं की ज्यांनी काहीच दिलं नाही, १५ वर्षे मत देऊन पाहीलं. आम्ही हे म्हणत नाही की तुम्ही भाजपा सोडून या परंतु एकदा केजरीवालला संधी देऊन तर पाहा. एकदा केजरीवालाला संधी देऊन पाहा, पाच वर्षात जर दिल्ली स्वच्छ केली नाही तर आम्हाला पुढीलवेळ मत देऊ नका. ” असं जाहीरपणे केजरीवाल म्हणाले.