‘एमडीएच’ मसाले कंपनीच्या चार मसाला उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळल्यामुळे हाँगकाँग आणि सिंगापूरने या मसाल्यावर बंदी घातली आहे. हाँगकाँगमधील सेंट्रल फूड सेफ्टी प्राधिकरणाने हे मसाले खरेदी न करण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. तसेच सिंगापूरमधील हे मसाले बाजारातून काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानंतर या मसाल्यांवरील बंदीबाबत भारतीय मसाले बोर्डानेही लक्ष घातले आहे. यानंतर आता यावर ‘एमडीएच’ मसाले कंपनीकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
‘एमडीएच’ने काय सांगितले?
भारतीय मसाला निर्माता एमडीएच कंपनीने सांगितले की, “एमडीएचचे उत्पादने वापरासाठी सुरक्षित आहेत. तसेच कंपनीला अद्याप त्यांच्या उत्पादनांमध्ये कथित दूषिततेबद्दल हाँगकाँग किंवा सिंगापूरमधील अन्न सुरक्षा नियामक प्राधिकरणाकडून कोणताही संवाद प्राप्त झालेला नाही”. एमडीएचने रविवारी एका निवेदनात म्हटले, “आम्ही आमच्या खरेदीदारांना आणि ग्राहकांना खात्री देतो, आम्ही आमच्या मसाल्यांच्या साठवणीच्या प्रक्रिया आणि पॅकिंग प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर इथिलीन ऑक्साईडचा वापर करत नाही”, असे कंपनीने म्हटले. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
हेही वाचा : हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; हिंदुस्तान युनिलिव्हरला हा निर्णय का घ्यावा लागला?
दरम्यान, ‘एमडीएच’ आणि एव्हरेस्टचे मसाले भारतात आणि परदेशातही सर्वाधिक लोकप्रिय मसाले आहेत. हे मसाले युरोप, आशिया आणि अमेरिकेतही विकले जातात. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आता या मसाल्यावर हाँगकाँग आणि सिंगापूरने बंदी घातल्यानंतर यूएस अन्न आणि औषध प्रशासन एमडीएच आणि एव्हरेस्टच्या उत्पादनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु केले आहे.
भारत सरकारने काय भूमिका घेतली?
माहितीनुसार, भारतीय मसाला निर्माता एमडीएच कंपनीच्या मसाल्यावर हाँगकाँग आणि सिंगापूरने बंदी घातल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) गुणवत्ता मानके तपासणार असल्याची माहिती आहे. तसेच भारताच्या मसाले मंडळाने हाँगकाँग आणि सिंगापूरमधील अधिकाऱ्यांकडून एमडीएचच्या आणि एव्हरेस्टच्या निर्यातीचा डेटा मागवला असून या मसाल्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे.