येत्या काही वेळातच लोकसभेच्या निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. यासाठी अवघ्या देशाचं आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष आहे. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी गेल्या दोन महिन्यांपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जाहीर सभा, रॅली, जाहीरनाम्यांना सुरुवात झाली आहे. तसंच, भारतीय जनता पक्षाने त्याही पुढे जाऊन पक्षाचं गाणं सादर केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने घराणेशाहीवर टीका केली आहे. तर विरोधकांनी मोदींचं कुटुंब नसल्यावरून मोदींना लक्ष्य केलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजपाने सादर केलेलं गाणं हे कुटुंबाला अधोरेखित करणारं आहे. मे मोदी का परिवार हूं (मी मोदींचं कुटुंब आहे) असं या गाण्याचे बोल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स खात्यावरून हे नवं गाणं शेअर करण्यात आलं आहे. मेरा भारत, मेरा परिवार असं कॅप्शन मोदींनी या व्हीडिओला दिलं आहे.
गाण्यात नेमकं काय दाखवलं?
या व्हीडिओमध्ये देशातील प्रत्येक राज्यातील नागरिकांची झलक पाहायला मिळते. महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून तरुणांपर्यंतच्या योजनांची माहिती या व्हीडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तसंच, देशभरातील मोदींच्या सभांची, दौऱ्यांची झलक यात पाहायला मिळतेय. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला होता. यावेळी त्यांनी मंदिर निर्माणासाठी काम करणाऱ्या कामगारांवर पुष्पवर्षाव केला होता. याचेही क्षणचित्र या गाण्याच्या व्हीडिओमध्ये आहेत.
देशातील विविध भाषेत गाणं
३ मिनिट १३ सेकंदाचं हे गाणं हिंदीत रचण्यात आलं आहे. तर या गाण्यातील ‘में मोदी का परिवार हूं’ ही रचना गुजराती, मराठी, पंजाबी, उडिया, तामिळसह ११ अन्य भाषेतही गायले गेले आहे.
मोदी का परिवार
पटना येथे ३ मार्च रोजी महागठबंधनच्या रॅलीत लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर टीका करतात, पण त्यांना स्वतःचं कुटुंब का नाहीय? असा तिखट प्रश्न लालू प्रसाद यादव यांनी विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर भाजपाने एक्सवरून दिलं होतं. सर्वांशी आत्मियता आणि सर्वांशी काळजी, म्हणूनच १४० कोटी देशवासी पंतप्रधान मोदींचं कुटुंब आहे, असा पलटवार भाजपाने केला होता. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी सोशल मीडियावरील खात्यावर मोदी का परिवार असं लिहिण्यास सुरुवात केली.