गेल्या काही दिवसांपासून भारतात हिजाब घालण्यावरून मोठा वाद सुरू आहे. कर्नाटकमधल्या उडुपीमध्ये महाविद्यालयात हिजाब घालणाऱ्या मुस्लीम मुलींना प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या असून आता त्यावर इतर देशांमधून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नुकतीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी यावरून भारतावर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर आता भारतानं या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या इतर देशांना भारताच्या अंतर्गत बाबींवर न बोलण्याबद्दल सुनावलं आहे.
“हा मुद्दा सध्या न्यायालयासमोर आहे”
हिजाब वादावरून टीका करणाऱ्या देशांसाठी भारतानं निवेदन जारी केलं आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माध्यमांच्या प्रश्नांवर उत्तर देताना माहिती दिली आहे. “कर्नाटकमधील काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या ड्रेसकोडविषयीचा वाद सुरू असून त्याची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयात सुरू आहे. हा मुद्दा आमची घटनात्मक चौकट, कार्यपद्धती, लोकशाही मूल्य, धोरणं यासंदर्भात तपासला जात आहे आणि सोडवला जात आहे”, असं अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे.
“जे भारताला व्यवस्थित ओळखतात…”
दरम्यान, यासंदर्भात भारतानं टीका करणाऱ्या देशांना खोचक टोला देखील लगावला आहे. “जे भारताला व्यवस्थित ओळखतात, ते ही सर्व वास्तव परिस्थिती समजून घेतील. पण आमच्या अंतर्गत मुद्द्यांवर हेतुपुरस्सर करण्यात येणारी विधानं सहन केली जाणार नाहीत”, असं बागची यांनी ठणकावलं आहे.
पाकिस्तानकडून यासंदर्भात बुधवारी रात्री चिंता व्यक्त करण्याता आली होती. पाकिस्तानने भारताच्या प्रभारी राजदूताला पाचारण करून, कर्नाटकमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावर घातलेल्या बंदीबाबत आपली गंभीर चिंता कळवली. भारतात मुस्लिमांविरुद्धची कथित धार्मिक असहिष्णुता, नकारात्मक साचेबंद चित्रण आणि भेदभाव याबाबत पाकिस्तानला वाटणारी अतीव चिंता भारतीय राजदूतांना कळवण्यात आली, असे परराष्ट्र कार्यालयाने बुधवारी उशिरा रात्री एका निवेदनात जाहीर केले होते. त्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी देखील पाकिस्तानला ठणकावलं होतं.
काय म्हणाले ओवैसी?
असदुद्दीन औवैसी यांनी उत्तर प्रदेशमधील एका प्रचारसभेत बोलताना पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे. “मलालावर हल्ला पाकिस्तानमध्येच झाला होता. पाकिस्तानच्या संविधानानुसार कुणी गैरमुस्लीम व्यक्ती तिथला पंतप्रधान होऊ शकत नाही. आम्ही पाकिस्तानच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही इकडे बघू नका. तिकडेच बघा”, असं ओवैसी म्हणाले आहेत.