नैराश्य व ताण यावर आधुनिक उपचार शोधण्यासाठी आता यांत्रिक उंदराची मदत घेण्यात येत आहे. यांत्रिक रूपातील एक हिंसक उंदीर तयार करण्यात आला असून तो प्रयोगशाळेतील इतर उंदरांवर हल्ला करून त्यांना चिडवेल व त्यांच्या वर्तनातील बदल बघून नैराश्य व ताण यावर उपचारपद्धती तयार करण्यास मदत होणार आहे.
उंदरांचा वापर मानवी मानसिक आजारांवरील औषधांच्या चाचण्यांसाठी केला जातो. ज्या उंदरांना अशी औषधे दिली आहेत त्यांना यंत्रमानवशास्त्र वापरून तयार केलेला उंदीर चिडवेल व त्यांची क्षमता तपासेल. उंदरांवर चाचण्या करण्यापूर्वी त्यांना नैराश्य आणण्याचे काम हा यांत्रिक उंदीर करतो. यापूर्वी या उंदरांमध्ये नैराश्य तयार करण्यासाठी त्यांना जबरदस्तीने पोहायला लावले जात असे, इलेक्ट्रिक शॉक दिले जात असत, असे डेली मेलने म्हटले आहे. जपानच्या वाकेडा विद्यापीठात ताण निर्माण करणारे यंत्र यांत्रिक उंदराच्या रूपाने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे उंदरांमध्ये ताण व नैराश्य निर्माण करता येते. या यांत्रिक उंदराचे नाव डब्लूआर -३ असून तो दोन चाकांवर चालतो त्याचा यांत्रिक सांगाडाही आहे. तो मूलभूत हालचाली करू शकतो. त्याचा आकार हा पांढऱ्या प्रौढ उंदरासारखा आहे. हा यांत्रिक उंदीर जिवंत उंदरांशी व्यवस्थित आंतरक्रिया करतो.
न्यू सायंटिस्टने दिलेल्या माहितीनुसार संशोधकांनी नंतर दोन वयोगटातील बारा उंदरांवर प्रयोग केले त्यांच्यात हा यांत्रिक उंदीर नैराश्य निर्माण करू शकतो काय हे तपासले. ज्या उंदरांवर ताण असतो ते फारशा हालचाली करत नाहीत. अ गटातील उंदरांना या यांत्रिक उंदराने हैराण केले तर ब गटातील उंदरावर हल्ले करण्यात आले.
तरूण उंदरांना सतत छळले तर त्यांच्यात नैराश्य येते तर प्रौढ उंदरांवर सतत हल्ले करीत राहिल्यास त्यांच्यात नैराश्य येते. आता या नैराश्यग्रस्त उंदरांना ताणहारक औषधे दिली तर त्यांच्या वर्तनात काय बदल होतो याचा अभ्यास करण्यात येईल असे संशोधक गटाचे प्रमुख हिरोयुकी इशी यांनी सांगितले.