मुस्लिमांबाबत बातम्या देताना केला जाणारा पक्षपात त्यांच्या मनांत अन्यायाची भावना निर्माण करतो. त्यामुळे मुस्लीम समाजाची प्रतिमा डागाळण्यास प्रसारमाध्यमांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे, असा आरोप प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मरकडेय काटजू यांनी केला. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जातीयता पसरविण्यासाठी करू नका, असा सल्लाही काटजू यांनी माध्यमांना दिला.
‘‘एखादा बॉम्बस्फोट किंवा कोणतीही तत्सम दहशतवादी घटना घडली की अनेक वृत्तवाहिन्या त्या घटनेची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीन किंवा हरकत उल जिहाद ए इस्लाम किंवा जैश ए मोहम्मद किंवा अन्य मुस्लीम दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचा एसएमएस-ई-मेल आल्याचे सांगतात. मात्र असे एसएमएस-ई-मेल एखादी खोडसाळ व्यक्तीही पाठवू शकते’’, असे काटजू म्हणाले आणि अशा बातम्या प्राधान्याने दाखवल्या गेल्यामुळे समाजात मुस्लिमांना स्फोट करण्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही उद्योग नाहीत, असा समज पसरत जातो. आपल्या बेजबाबदारपणाने प्रसारमाध्यमे मुस्लिमांच्या प्रतिमा डागाळत आहेत, असा आरोप त्यांनी पुढे केला.
इंग्रजी दैनिक ‘द हिंदू’तर्फे आयोजित ‘दहशतवादाचे वृत्तांकन : प्रसारमाध्यमे किती संवेदनशील आहेत?’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.  देशात जातीयवादाला खतपाणी घालण्यास प्रसारमाध्यमांची बेजबाबदार वृत्तीच कारणीभूत आहे, माध्यमांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे आणि नैतिकतेने वागावे असा सल्ला काटजू यांनी दिला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जातीयता पसरविण्यासाठी करण्याचा प्रसारमाध्यमांना काहीही अधिकार नाही, राष्ट्रीय हितसंबंधांना बाधा येईल अशी वृत्तांकने करण्यापूर्वी हजारदा विचार करावा.दहशतवादाचे मूळ पक्षपातात दडलेले आहे आणि दारिद्रय़ निर्मूलनाद्वारे दहशतवादास खीळ घातली जाऊ शकते असेही काटजूंनी भाषणादरम्यान नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा