मराठीमध्ये अनेक प्रतिशब्द आहेत. वेगवेगळ्या शब्दांच्या अर्थानाही छटा आहेत. त्यामुळे मराठी माध्यमांनी अशा शब्दांचा शोध घेत त्यांचा वापर करावा, असे आदेश न्यायमूर्ती झालेल्या वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी शनिवारी दिले. माध्यमांनी कमीत कमी इंग्रजी शब्द वापरावेत, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.
दृक-श्राव्य माध्यमातील संहितालेखन या विषयावर आयोजित अभिरुप न्यायालय स्थगित करून या विषयावर चर्चा घेण्यात आली. प्रसिद्ध लेखक राजन खान, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, संहितालेखक संजय मोने, एपीबी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि आकाशवाणीच्या रसिका देशमुख यांच्याशी  सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला. प्रमाणभाषा असावी का या मुद्द्याला सर्वानी विरोध केला. राज्यात अनेक बोली बोलल्या जातात. त्यामुळे कोणत्याही एका प्रमाण भाषेचा आग्रह धरला जाऊ नये, अशी भूमिका सर्वच वक्त्यांनी मांडली.
एखादी व्यक्ती ज्या संस्कारामध्ये वाढते तीच त्याची प्रमाणभाषा बनते. त्यामुळे प्रमाणभाषा हे ढोंगच आहे, अशा शब्दांत राजन खान यांनी टिप्पणी केली. मराठीमध्ये वापरल्या जाणार्या इंग्रजी शब्दांविषयी अनेकांनी आक्षेप नोंदविले असले तरी काही शब्दांचा वापर अनिवार्य असल्याचे मत राजीव खांडेकर यांनी मांडले. मराठीबद्दल आग्रह धरताना त्याचा दुराग्रह होता कामा नये, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा