माध्यम सम्राट आणि अब्जाधीश रुपर्ट मरडॉक यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न केलं आहे. कॅलिफोर्निया येथील फार्महाऊसवर ६७ वर्षीय प्रेयसी एलेना झुकोवा यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. एफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एलेना या जीवशास्त्रज्ञ असून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. एप्रिल २०२३ मध्ये माजी पोलीस अधिकारी ॲन लेस्ली स्मिथ यांच्याशी ठरलेलं लग्न मोडल्यापासून मरडॉक हे एलेना झुकोवा यांना डेट करत होते.
रुपर्ट मरडॉक यांना सहा मुले आहेत. त्यांचे पहिले लग्न ऑस्ट्रेलियन फ्लाईट अटेंडंट पॅट्रिशिया बुकर यांच्याशी झाले होते. १९६० च्या दशकात त्यांनी पहिला घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ते आणि त्यांची दुसरी पत्नी पत्रकार ॲना टोर्व्ह हे ३० वर्षांहून अधिककाळ एकत्र राहिले. १९९९ मध्ये त्यांनी दुसरा घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी वेंडी डेंग यांच्याशी तिसरा घटस्फोट घेतला होता.
रुपर्ट मरडॉक यांनी मॉडेल जेरी हॉलशी चौथे लग्न केले होते.
कोण आहेत रुपर्ट मरडॉक?
ऑस्ट्रेलियन वंशाचे मरडॉक हे जागतिक माध्यम क्षेत्रातील बडे प्रस्थ आहेत. वॉल स्ट्रीट जर्नल, फॉक्स न्यूज आणि इतर प्रभावशाली माध्यमांची मालकी त्यांच्याकडे आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या माध्यम कंपन्यांचे मूल्य २० अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मरडॉक यांनी आपली खुर्ची मुलगा लचलानला दिली होती. त्यानंतर ते निवृत्तीचे आयुष्य जगत आहेत.