एमबीबीएस, बीडीएस आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उठवली. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी त्यांची कोणतीही चूक नसताना ‘धोरणात्मक निर्णया’ची शिकार होऊ नयेत, यासाठी ज्या ठिकाणी परीक्षा झाल्या आहेत, अशा ठिकाणी प्रवेशप्रक्रियाही सुरू करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने एमबीबीएस व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पहिलीवहिली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा घेतली असून त्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांची सुनावणी प्रलंबित आहे. याप्रकरणी १३ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियासह विविध राज्य सरकारे, विद्यापीठे व अन्य संस्थांना वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्याची परवानगी दिली होती. मात्र, पुढील आदेश येईपर्यंत त्याचे निकाल जाहीर करण्यास मनाई केली होती. परंतु, या खटल्याची सुनावणी विशिष्ट कालावधीत न होऊ शकल्याने आधीच्या आदेशात सुधारणा करण्याचा निर्णय सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सोमवारी जाहीर केला.
या निर्णयानुसार, एमबीबीएस, बीडीएस तसेच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ज्या ठिकाणी आधीच प्रवेश परीक्षा झाली आहे, त्याठिकाणी निकाल जाहीर करता येतील. तसेच प्रवेश प्रक्रियाही राबवता येऊ शकेल.