Medicine Price Hike : देशातील सर्वसामान्य जनतेसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या महिन्यापासून ९०० हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती १.७४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे लोकांचा औषधांवरील खर्च वाढणार आहे. यामध्ये संसर्ग (इन्फेक्शन), मधुमेह व हृदयाशी संबंधित आजारांवरील औषधांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या रसायन व खते मंत्रालयाच्या अखत्यारित येणारी राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी (एनपीपीए) अत्यावश्यक औषधांच्या किंमती ठरवते. औषधांच्या किंमती या मागील वर्षाच्या घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) लक्षात घेऊन वाढवल्या जातात.
एनपीपीएने यासंबंधीचं एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की कॅलेंडर वर्ष २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये डल्ब्यूपीआयमध्ये १.७४०२८ टक्के बदल झाला आहे. औषध उत्पादक कंपन्या याच डल्ब्यूपीआयच्या आधारावर अनुसूचित फॉर्म्यूलेशनची कमाल किरकोळ किंमत वाढवू शकतात आणि यासाठी सरकारच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नसते.
मलेरियावरील टॅब्लेट, अॅन्टीव्हायरल औषधे व अॅन्टीबायोटिकच्या किंमती वाढणार
मलेरिया, अॅन्टीव्हायरल (विषाणूविरोधी) औषधे व प्रतिजैविकांच्या (अॅन्टीबायोटिक) किंमती वाढणार आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानंतर अॅन्टीबायोटिक औषध अजिथ्रोमायसिनची किंमत प्रति टॅब्लेट ११.८७ रुपये (२५० मिलिग्रॅम) आणि २३.९८ रुपये (५०० मिलिग्रॅम) इतकी असेल. अमोक्सिसिलिन व क्लेव्हुलेनिक अॅसिडच्या फॉर्म्युलेशनसह अॅन्टीबॅक्टेरियल ड्राय सिरपची किंमत २.०९ रुपये प्रति मिली इतकी असेल.
एसायक्लोव्हिरसारख्या अॅन्टीव्हायरल औषधाची किंमत ७.७४ रुपये (२०० मिलीग्रॅम) आणि १३.९० रुपये (४०० मिलीग्रॅम) प्रति टॅब्लेट इतकी असेल. तर, मलेरियावरील उपचारांसाठी घेतल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची किंमत प्रति टॅब्लेट ६.४७ रुपये (२०० मिलीग्रॅम) व १४.०४ रुपये (४०० मिलिग्रॅम) इतकी असेल.
पेन किलर्सही महागले
वेदनेपासून आराम देण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या डायक्लोफेनाकची किंमत आता २.०९ रुपये प्रति टॅब्लेट इतकी असेल. तर इबुप्रोफेनसाठी प्रति टॅब्लेट ०.७२ रुपये (२०० एमजी) व १.२२ रुपये (४०० एमजी) मोजावे लागतील. एनपीपीएने अत्यावश्यक औषधांच्या यादीमधील १,००० हून अधिक औषधांच्या किंमती वाढवण्यास मान्यता दिली आहे.