Meerut Merchant Navy Officer Case : उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमधील एका अधिकाऱ्याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या करून पतीच्या मृतदेहाचे १५ तुकडे करत सिमेंटने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवले होते. या प्रकरणात पोलिसांनी आता मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला अटक केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, सौरभ राजपूत नुकताच लंडनवरून भारतात आला होता. २०१६ रोजी सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता. मेरठमध्ये हे जोडपे राहत होते. या दोघांना एक मुलगी देखील आहे. मात्र, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. या घटनेत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीडित सौरभ राजपूतची पत्नी मुस्कानला तिचा प्रियकर साहिल शुक्लाने व्यसनी बनवलं होतं. गांजा आणि ड्रग्जच्या व्यसनामुळे ती प्रियकराला सोडू शकत नव्हती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त दैनिक भास्करच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, मेरठ शहराचे एसपी आयुष विक्रम सिंह यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, “सौरभ ४ मार्च रोजी घरी आला होता आणि तेव्हापासून बेपत्ता होता. या प्रकरणात पत्नी मुस्कान आणि तिचा साथीदार साहिलची चौकशी करण्यात येत आहे. यावेळी चौकशी दरम्यान साहिलने कबूल केलं की त्याने आणि मुस्कानने ४ मार्च रोजी सौरभची चाकूने वार करून हत्या केली. त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यानंतर ड्रममध्ये ठेवले आणि सिमेंटने बंद केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच साहिल आणि मुस्कानच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे”, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून सौरभ राजपूतला त्यांचा भाऊ संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, संपर्क होत नव्हता. त्यानंतर १८ मार्च रोजी सौरभ राजपूत यांचा भाऊ त्यांच्या घरी गेला पण तेव्हा त्यांच्या घरी कोणीही नव्हतं. त्यानंतर सौरभ राजपूत यांच्या भावाने मुस्कानला फोन केला. पण मुस्कानने सांगितलं की आपण आपल्या वडिलांच्या घरी आहोत. त्यानंतर भावाने शेजाऱ्यांकडून भावाच्या ठावठिकाणाबाबत विचारपूस केली. त्यानंतर भाऊ घरात शिरला आणि त्याला दुर्गंधी आली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि घराची झडती घेण्यात आली असता मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत यांच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.