Meerut Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमधील एका अधिकाऱ्याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करत सिमेंटने भरलेल्या एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये काँक्रिटसह पुरले होते. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आता मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला अटक केली आहे.

सौरभ राजपूत नुकताच लंडनवरून घरी आला होता. २०१६ रोजी सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता. मेरठमध्ये हे जोडपे राहत होते. या दोघांना एक मुलगी देखील आहे. मात्र, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. मात्र, ही हत्या कशी केली? हत्या करताना कशाचा वापर केला? यात नेमकं कोणाचा सहभाग आहे? याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चाकू विकत घेतला, ऑनलाइन औषध मागवले

पोलिसांच्या माहितीनुसार, मुस्कान रस्तोगीने तिच्या पतीच्या हत्येसाठी चाकू विकत घेतला होता. तसेच तिने तिचा प्रियकर साहिल शुक्लाला त्याची मृत आई स्नॅपचॅटद्वारे त्याच्याशी बोलत असल्याचं पटवून देत हत्येचा कट रचला. मुस्कान नोव्हेंबरपासून तिच्या पतीच्या हत्येची योजना आखत होती. २२ फेब्रुवारी रोजी तिने ८०० रुपयांचे दोन चाकूही खरेदी केले होते. तसेच दुकानदाराला सांगितलं होतं की ती या चाकूचा वापर चिकनकापण्यासाठी करणार आहे.

तसेच तिने आजारी असल्याचं नाटक करून डॉक्टरांकडे जाऊन औषधाचे प्रिस्क्रिप्शन घेतलं होतं. त्यानंतर तिने दोन औषधांची ऑनलाइन नावे पाहिली, ज्याचा वापर ती सौरभला बेशुद्ध करण्यासाठी करू शकते. ती दोन औषधे तिने त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये जोडली, जेणेकरून ती ते औषधे विकत घेऊ शकेल, अशी माहिती आता समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

वृत्तानुसार, पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, मुस्कानने स्नॅपचॅटवर अकाउंट बनवलं होतं आणि साहिलला खात्री पटवून देण्यात यशस्वी झाली की त्याची मृत आई त्याच्याशी बोलण्यासाठी सोशल मीडिया अॅपचा वापर करत आहे. साहिलच्या आईच्या नावाने अकाउंट बनवलं नव्हते, पण मुस्कानने असे मेसेज पाठवले होते की त्यामुळे त्याला असं वाटू लागलं की त्याची मृत आई पुनर्जन्म घेऊन त्याच्याशी बोलत आहे. तसेच मुस्कानने साहिलला नियंत्रित करण्यासाठी आणि सौरभची हत्या करण्यासाठी त्याला पटवून देण्यासाठी या मेसेजचा वापर केला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

सौरभचा मृतदेह पुरण्यासाठी मुस्कानने जागा शोधली होती

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मुस्कानने सौरभचा मृतदेह पुरण्यासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली. तिने तिच्या मैत्रिणींना सांगितलं होतं की तिला प्रार्थना विधी करायचा आहे आणि त्यासाठी वापरलेले काही साहित्य पुरायचे आहे. पण मैत्रिणींनी तिला जागा शोधण्यात मदत केली नाही. मुस्कानला कळलं की सौरभ फेब्रुवारीमध्ये त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मेरठला परतणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी सौरभ मेरठला परतला आणि दुसऱ्या दिवशी मुस्कानने त्याच्या दारूमध्ये औषधे मिसळली, पण तो मद्यपान केला नाही. त्यानंतर ४ मार्च रोजी सौरभला मुस्कान आणि तिच्या प्रियकराने काही औषधे दिले आणि त्यानंतर हत्या केली.

प्रियकरामुळे मुस्कानला अंमली पदार्थाचे व्यसन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानचा प्रियकर साहिल शुक्ला अंमली पदार्थांचे व्यसन करत होता. त्याने मुस्कानलाही या व्यसनाची सवय लावली होती. दोघेही भेटल्यानंतर अंमली पदार्थाचे सेवन करत असत. या व्यसनामुळेच तिला साहिलला सोडायचे नव्हते. सौरभ राजपूत याला विरोध करेल, या भीतीपोटी दोघांनी त्याला संपविण्याचा कट रचला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

Story img Loader