Meerut Saurabh Rajput Murder Case : मेरठ येथील मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याचं हत्याकांड हा सध्या देशभर चर्चेचा विषय बनला आहे. या हत्येप्रकरणी मृत सौरभ राजपूत याची पत्नी मुस्कान रस्तोगी व तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास व आरोपींच्या चौकशीनंतर वेगवेगळे खुलासे होऊ लागले आहेत. मुस्कानने सौरभला बेशुद्ध करण्यासाठी ज्या मेडिकलमधून इंजेक्शन खरेदी केलं होतं तिथपर्यंत पोलीस पोहोचले आहेत. या तपासात त्यांना धक्कादायक माहिती मिळाली आहे.

मुस्कानने डॉक्टरांच प्रिस्क्रिप्शन बदलून बेशुद्धीचं इंजेक्शन खरेदी केल्याचं समोर आलं आहे. पोलीस म्हणाले की “मुस्कानने गुंगीचं इंजेक्शन खरेदी करण्यासाठी डॉक्टरांच्या एका प्रिस्क्रिप्शनशी छेडछाड केली होती.” मेरठचे ड्रग इन्स्पेक्टर पियूष शर्मा म्हणाले, “ज्या दुकानातून मुस्कानने गुंगीचं इंजेक्शन खरेदी केलं होतं तिथे आम्ही तपास केला. आरोपीने वापरलेली औषधे व गुंगीच्या इंजेक्शनबाबत आम्ही माहिती गोळा करत होतो. जी औषधे मुस्कानने वापरली होती ती डॉक्टरांच्या प्रस्क्रिप्शनशिवाय कुठेही विकली जात नाहीत. त्यामुळे आम्हाला संशय आला होता. तरी देखील मुस्कान सदर औषधे खरेदी करू शकली कारण तिने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशी छेडछाड केली होती.”

पियूष शर्मा म्हणाले, “आम्ही गेल्या दोन वर्षांच्या नोंदी तपासत आहोत. पुरेशी माहिती वा पुरावे हाती लागल्यानंतर आम्ही मेडिकल मालकाविरोधात गुन्हा दाखल करू. सदर मेडिकलचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. मुस्कानने झोपेच्या गोळ्या खरेदी केल्या होत्या. झोपेच्या गोळ्या, अँटिडिप्रेसेंट औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर या दुकानदारांना अशा औषधांच्या विक्रीची नोंद ठेवणं बंधनकारक आहे.”

दोन्ही आरोपींना ड्रग्सचं व्यसन, तुरुगांतही केली मॉर्फिनची मागणी

दरम्यान, मुस्कान रस्तोगी व तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनाही अंमली पदार्थांचं व्यसन असल्याचं समोर आलं आहे. ते तुरुंगातही अंमली पदार्थांची मागणी करत असून तुरुंगातील जेवण नाकारत असल्याचं हिंदूस्तान टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

“मुस्कानने तिचा प्रियकर साहिलला हाताशी धरून ४ मार्च रोजी तिचा पती सौरभची चाकूने वार करून हत्या केली आणि नंतर त्याच्या शरिराचे तुकडे करून ड्रममध्ये लपवले. त्या ड्रममध्ये नंतर त्यांनी सिमेंट भरले. या दुष्कृत्यानंतर प्रेमीयुगालाने त्यांचं कृत्य लपवण्यासाठी हिमाचल प्रदेशला पलायन केलं होतं.