Wife Kills Husband in UP: मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी लंडनहून परतलेल्या मर्चंट अधिकारी सौरभ राजपूतची हत्या त्याच्या पत्नीनेच केल्याचे उघड झाले होते. महिन्याभरापासून हे प्रकरण चर्चेत आहे. त्यातच आता मेरठ प्रकरणाची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशमध्ये झाल्याचे निदर्शनास आले आहे. बिजनौर येथे एक महिलेने रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या तिच्या पतीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या खूनाचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पत्नीने पतीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात तिचा बनाव उघड झाला.
पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, या जोडप्याचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना सहा महिन्यांची एक मुलगी आहे. बिजनौर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजीव वाजपेयी म्हणाले की, दीपक हा त्यांच्या भाड्याच्या घरात मृत आढळला होता.
दीपकची पत्नी शिवानीने दीर पियुषला फोन करून सांगितले की, दीपकला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर संशय
पोलिसांनी सांगितले की, दीपकचा भाऊ पियुष रुग्णालयात पोहचला तेव्हा भावाचा मृत्यू झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पण हा मृत्यू नैसर्गिक नसून यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा त्याचा संशय होता. त्यानंतर त्याने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि शवविच्छेदन चाचणी केली जावी, अशी मागणी केली. तसेच शिवानीने शवविच्छेदन करण्यासाठी नकार दिल्यामुळेही पियुषचा संशय बळावला होता, अशी माहिती न्यूज १८ च्या वृत्तात दिली आहे.
दीपकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर गळा दाबल्याने झाला होता, अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली. ही बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी शिवानीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक वाजपेयी यांनी सांगितले की, शिवानी ही सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासानुसार शिवानीने पतीला आधी झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तो शुद्धीत नसताना त्याचा गळा दाबून खून केला.
तसेच दीपकच्या काकांनी सांगितले की, शिवानीने एकट्याने हा खून केलेला नसावा. यात आणखी काही लोक सामील असावेत. तिने हे पैशांसाठी केले की, त्याच्या नोकरीवर डल्ला मारण्यासाठी केले, हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. पण हा खून शिवानीनेच केलेला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.