Meerut Murder Update : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये माजी मर्चंट नेव्हीमधील एका अधिकार्‍याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. सौरभ राजपूत असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच सौरभच्या मृतदेहाचे १५ तुकडे करत ते एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून सिमेंट काँक्रिटसह पुरले. दरम्यानया प्रकरणात आता दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. मेरठचे एसपी (शहर) विक्रम सिंह यांनी आता पुन्हा एकदा या हत्याकांडाबद्दल नवीन माहिती दिली आहे.

२०२४ पासून सुरू होतं प्लॅनिंग

२९ वर्षीय सौरभ हा ३ मार्च रोजी त्याच्या पत्नी आणि मुलगी यांना भेटण्यासाठी येताना त्याच्या आईने बनवलेले भोपळ्यापासून बनवलेले कोफ्ते हा खाद्यपदार्थ घेऊन आला होता. नोव्हेंबर २०२४ पासून नवऱ्याची हत्या करण्याचा विचारात असलेल्या मुस्कान (२७) ने ही संधी साधून तिने तो पदार्थ पुन्हा गरम केला आणि त्यामध्ये गुंगीचे औषध मिसळले. सौरभ ते खाल्ल्याने बेशुद्ध झाला, त्यानंतर तिने तिचा प्रियकर साहिल शुक्ला (२७) याला सौरभची हत्या करण्यासाठी इंदिरा नगर येथील त्यांच्या भाड्याच्या घरात बोलावून घेतले. यानंतर त्या दोघांनी झोपलेल्या सौरभवर चाकूने हल्ला केला आणि त्याच्या मृत्यू होत नाही तोपर्यंत त्याच्यावर वारंवार वार केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

गुगलवर काय शोधलं?

पोलिसांनी सांगितलं की, मुस्कान संशय येणार नाही अशा झोपेच्या गोळ्या आणि गुंगी आणणाऱ्या औषधांचा शोध घेत होती. २२ फेब्रुवारी रोजी मुस्कान शारदा रोडवरी एका डॉक्टरकडे गेली होती आणि तिने आपण नैराश्यात असल्याचे सांगून तिने झोपेच्या गोळ्यांची मागणी केली. तिच्या हत्येच्या योजनेसाठी पुरेशा ठरतील इतक्या झोपेच्या गोळ्या डॉक्टराने न दिल्याने तिने औषधांची नावे गुगलवर सर्च केली.

काही नावे मिळवल्यानंतर तिने आणि साहिलने खारिया नगरमधील एका फार्मसीमधून झोपेच्या गोळ्या आणि गुंगी आणणारी काही औषधे खरेदी केली. इतकेच नाही तर साहिलचे काम सोपे करण्यासाठी त्यांनी ८०० रुपये किमतीचे दोन मांस कापण्याचे चाकू, ३०० रुपये किमतीचा रेझर आणि पॉलिथिन पिशव्या देखील खरेदी केल्या, असेही पोलिसांनी सांगितले.