Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील मेरठमधील मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या हत्याकांडाने काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी व तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून सौरभ राजपूतची हत्या केली होती आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून एका निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून काँक्रिट टाकले होते. या घटनेनंतर आता आणखी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून समोर आली आहे.

एका महिलेने पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या महिलेने पतीला मारहाण केल्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. वृत्तानुसार, संबंधित महिलेने आपल्या पतीला धमकी देत मेरठच्या घटनेतील मुस्कानने केल्याप्रमाणे पतीच्या शरीराचे अवयव कापून ड्रममध्ये ठेवेल अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

नेमकं घटना काय घडली

मेरठ हत्याकांडाची घटना घडल्याच्या काही दिवसानंतरच उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच पत्नीने त्याच्यावर हल्ला करत आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला. तसेच मुस्कानने केल्याप्रमाणे करण्याची धमकी देत आपल्याला निळा रंगाचा ड्रम दाखवल्याचे खळबळजनक आरोप पतीने केले आहेत.

या घटनेतील पत्नीने देखील आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पतीचे तिच्या एका बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. तसेस तिचा पती तिला घटस्फोट देण्याची धमकी देत असून तो तिच्याच एका बहिणीशी लग्न करण्याच्या विचारात असल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

दरम्यान, धर्मेंद्र कुशवाह याने २०१६ मध्ये त्याची मैत्रीण माया हिच्याशी लग्न केलं होतं. मात्र, आता धर्मेंद्र कुशवाहने असा दावा केला आहे की पत्नीने सुखी वैवाहिक जीवनासाठी आलिशान गाड्या खरेदी करण्याची मागणी केली होती. यानंतर तीन गाड्या खरेदी केल्या. मात्र, तरीही वारंवार पत्नी आपला छळ करते. त्यामुळे तिच्या विरोधात पोलीस तक्रारी केली होती. दरम्यान, आता धर्मेंद्रने आरोप केला आहे की त्याच्या पत्नीने त्याच्यावर हल्ला केला आणि मुस्कानने केलेल्या घटनेप्रमाणे ती करेल आणि निळ्या ड्रममध्ये भरेल, अशी धमकी दिल्याचा आरोप पतीने केला आहे. दरम्यान, या प्रकरणात आता पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.