Meerut Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमधील एका अधिकाऱ्याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करत सिमेंटने भरलेल्या एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये काँक्रिटसह पुरले. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

या प्रकरणातील आरोपी सौरभची पत्नी मुस्कान (२७) आणि साहिल (२५) यांनी गुन्हा कबूल केला असून त्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सौरभच्या आईने खुलासा केला की, तिच्या सहा वर्षांच्या नातीने हा गुन्हा पाहिला. पत्रकारांशी संवाद साधताना सौरभची आईने म्हटलं की, शेजाऱ्यांनी त्यांना सांगितलं की मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने सौरभची हत्या केल्यानंतर मृतदेह एका ड्रममध्ये ठेवला होता. तेव्हा सौरभ आणि मुस्कानच्या चिमुकल्या मुलीने सांगितलं की आईने पप्पांना ड्रममध्ये ठेवलंय.

दरम्यान, सौरभचा मृतदेह ड्रममध्ये ठेवताना कदाचित त्या चिमुकल्या मुलीने पाहिलं असावं तेव्हा तिने असं सांगितलं असावं असं सौरभच्या आईने सांगितलं. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. सौरभच्या हत्येबद्दल बोलताना सौरभच्या आईने म्हटलं की, “मुस्कान आणि तिचा साथीदार साहिलने माझ्या मुलाची हत्या केली आणि त्यानंतर ती ट्रिपला गेली. तिने मृतदेह खोलीत बंद करून ठेवला होता. तसेच तो ड्रम मजुरांना उचलला नाही तेव्हा त्यात काय आहे असं विचारलं असता मुस्कानने घरातील कचरा असल्याचं सांगितलं. पण ड्रमचे टोपण उघडल्यानंतर कामगारांना आतून मृतदेहाचा वास आला आणि त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला”, अशी माहिती सौरभच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितली.

सौरभच्या आईने असाही आरोप केला की मुस्कानच्या आईला हत्येपूर्वी सर्व काही माहित होतं. तसेच माध्यमांशी बोलताना सौरभच्या बहिणीने तिच्या भावाच्या हत्येच्या घटनेबाबत सांगितलं. सौरभच्या बहिणीने आरोप केला की मुस्कान गुन्ह्यापूर्वी पाच दिवसांपासून बेपत्ता होती. सौरभ माझा धाकटा भाऊ होता. काल संध्याकाळी मला माझ्या आईचा फोन आला की सौरभ खून झाला. माझ्या आईने मला पोलीस स्टेशनला येण्यास सांगितलं तेव्हा मला या घटनेबाबत समजलं.

Story img Loader