Meerut Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची हत्या झाल्याची घटना घडली. मुस्कान रस्तोगी नामक महिलेने तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बरोबर घेऊन पती सौरभ राजपूतची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून एका ड्रममध्ये भरून वरून काँक्रिट ओतून बंद केलं होतं. एवढंच नाही तर पतीची हत्या केल्यानंतर पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे दोघे हिमाचल प्रदेशला फिरायला गेले होते. मात्र, आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला अटक केलं असून ते आता तुरुंगात आहेत.
दरम्यान, सौरभ राजपूतच्या हत्येच्या प्रकरणात आता दररोज अनेक खुलासे समोर येत आहेत. आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचं व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ते तुरुंगातही अंमली पदार्थांची मागणी करत असून तुरुंगातील जेवण नाकारत असल्याचंही वृत्त समोर आलं आहे. दरम्यान, आता मुस्कान रस्तोगी हिने बचाव पक्षाकडून सरकारी वकिलाची मागणी केली आहे.
आरोपी मुस्कान रस्तोगीने म्हटलं आहे की तिचे कुटुंब तिच्यावर नाराज आहे, त्यामुळे ते तिच्यासाठी लढणार नाहीत. त्यामुळे आपली बाजू मांडण्यासाठी बचाव पक्षाकडून सरकारी वकील मिळण्याची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदूस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, एका वरिष्ठ तुरुंग अधीक्षकांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, “रस्तोगी आणि शुक्ला यांना पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या असलेल्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तसेच दोन्ही तुरुंगांमध्ये कोणताही संपर्क नाही. काल मुस्कानने सांगितलं की तिचे कुटुंब तिच्यावर नाराज आहे आणि तिचा खटला लढणार नाहीत, म्हणून तिला सरकारी बचाव पक्षाचा वकील उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तिने केली आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयाला ही माहिती देऊ, कारण तो कैद्याचा अधिकार आहे”, असं त्यांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
तुरुंगातही अंमली पदार्थांची मागणी
सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक करण्यात आली असून त्यांना गंभीररित्या अंमली पदार्थांचं व्यसन असल्याचं समोर आलं आहे. ते तुरुंगातही अंमली पदार्थांची मागणी करत असून तुरुंगातील जेवन नाकारत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर एका तुरुंग अधिकाऱ्याने सांगितलं की, स्वतःचे किंवा इतरांचे नुकसान होऊ नये म्हणून अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुस्कान आणि साहिल यांच्याकडून अंमली पदार्थांच्या मागणी दरम्यान दोघांनीही जेवण नाकारत आहेत.