Meerut Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. सौरभ राजपूत असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून ही हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून एकाड्रममध्ये भरून सिमेंट काँक्रिटसह पुरले. दरम्यान, या प्रकरणात आता मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला पोलिसांनी अटक केलं असून त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या का केली? ही हत्या कशी केली? ही हत्या करण्याचामागे काय कारणे होती? अशा सर्व बाजूंनी पोलिसांकडून तपास केला जात आहे. आता सौरभ राजपूतच्या हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवालही समोर आला असून या शवविच्छेदन अहवालातून देखील अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आरोपी मुस्कान रस्तोगीच्या आईने प्रतिक्रिया देत मुलगी मुस्कान रस्तोगीला शिक्षा झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं.

मेरठ हत्याकांडातील आरोपी मुस्कान रस्तोगीची आई कविता यांनी प्रतिक्रिया देताना एक भावनिक आवाहन केलं आहे. मुस्कानच्या आईने म्हटलं की, “माझ्या मुलीने जर आमच्यापासून काही गोष्टी लपवून ठेवल्या नसत्या तर आज ती तुरुंगात गेली नसती”, असं सांगितलं. तसेच सर्व मुलांना एक सल्ला देत आपल्या पालकांपासून कधीही काहीही लपवू नका, असं भावनिक आवाहन मुस्कानच्या आईने केलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

मुस्कानच्या आईने काय म्हटलं?

“मी सर्व मुलांना सांगू इच्छिते की तुमच्या पालकांपासून कधीही काहीही लपवू नका. माझ्या मुलीने खूप मोठी चूक केली. मी तिला सतत विचारायचे की काही अडचण आहे? पण तिने सांगितलं नाही. तसेच तिचं वजन कमी होत राहिलं. तिने २ वर्षात १० किलो वजन कमी केलं होतं. तिने आमच्यापासून खूप गोष्टी लपवल्या आणि म्हणूनच ती आज तुरुंगात आहे. आम्हाला माहित नाही की तिचे ब्रेनवॉश केलं होतं की ती ड्रग्ज घेत होती. पण जर तिने आमच्याशी काही गोष्टी शेअर केल्या असत्या तर आज ती या परिस्थितीत नसती, अशी प्रतिक्रिया मुस्कानच्या आईने एएनआयशी बोलताना दिली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनी मिळून तिचा पती सौरभ राजपूतची हत्या केली. यामागचं कारण मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांच्या नात्यात सौरभ राजपूत अडथळा ठरत असल्याने त्यांनी मिळून हत्या केली. तसेच गुन्हा लवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये टाकले आणि त्यावर सिमेंट लावून पुरण्याचा प्रयत्न केला.

शवविच्छेदन अहवालात काय माहिती समोर आली?

शवविच्छेदन अहवालात असं दिसून आलं आहे की, सौरभ राजपूतची हत्या दोन आठवड्यांपूर्वीच करण्यात आली होती. तसेच त्याची त्वचा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशी माहिती शवविच्छेदन अहवालामधून समोर आली आहे. या संदर्भात मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ.अशोक कटारिया यांनी माहिती देताना सांगितलं की, “शवविच्छेदन अहवालातून असं दिसून आलं की, सौरभची हत्या दोन आठवड्यांपूर्वी झाली होती. तसेच त्याची त्वचा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्वचेला गंभीर नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच मृतदेहाचे अनेक भाग कापलेले होते. त्याचे दात देखील हालत होते आणि त्याची त्वचा खूप सैल झाली होती”, अशी माहिती त्यांनी दिलं.

कोण आहे मुस्कान रस्तोगी?

मुस्कान रस्तोगी २७ वर्षांची असून २०१६ साली तिने सौरभ राजपूतशी लग्न केले होते. या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा विरोध होता. सौरभने मुस्कानसाठी त्याच्या कुटुंबियांना सोडले होते. दोघेही मेरठमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. मुस्कानने २०१९ साली एका मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिल्यानंतर मुस्कान आणि तिचा बालपणीचा मित्र साहिल शुक्ला पुन्हा एकदा भेटले आणि त्यांच्यात संबंध सुरू झाले. मुस्कान आणि साहिल इयत्ता आठवीपर्यंत एकाच वर्गात होते.

Story img Loader