Meerut Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमधील मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या हत्याकांडाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या हत्याप्रकरणात मृत सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी व तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे आरोपी आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केलं असून ते सध्या तुरुंगात आहेत. सौरभ राजपूत हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तपासात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुस्कानने सौरभला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन खरेदी केले होते अशी माहिती आता समोर येत आहे.

मुस्कान रस्तोगीला तिच्या पालकांनी नाकारलं असून तिच्या कुटुंबीयांच्यावतीने कायदेशीर मदत देण्यास नकार दिला आहे. तसेच मुस्कानच्या कुटुंबीयांनी सांगितलं की मुस्कानला आम्ही कोणतीही कायदेशीर मदत देणार नाहीत. आम्ही मुस्कानशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं मुस्कानच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मुस्कानची आई कविता यांनी म्हटलं की, “आम्ही तिला (मुस्कान) कधीही भेटणार नाहीत, किंवा तिच्यासाठी लढणार देखील नाहीत. हे एक सामान्य प्रकरण नाही. हा एक मोठा गुन्हा आहे. ज्याप्रमाणे एखाद्या शरीराचा भाग कापला जातो, त्याचप्रमाणे आम्ही तिच्याशी संबंध तोडले आहेत. ती आमची मुलगी आहे, त्यामुळे भावनिकता नक्कीच निर्माण होईल. मात्र, अशा भयानक गुन्ह्यानंतर आम्ही तिला आधार देऊ शकत नाहीत”, असं मुस्कानची आईने म्हटलं आहे.

दरम्यान, मुस्कान रस्तोगी हिने बचाव पक्षाकडून सरकारी वकिलाची मागणी केली आहे. आरोपी मुस्कान रस्तोगीने म्हटलं आहे की तिचे कुटुंब तिच्यावर नाराज आहे, त्यामुळे ते तिच्यासाठी लढणार नाहीत. त्यामुळे आपली बाजू मांडण्यासाठी बचाव पक्षाकडून सरकारी वकील मिळण्याची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

तुरुंगातही अंमली पदार्थांची मागणी

सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक करण्यात आली असून त्यांना गंभीररित्या अंमली पदार्थांचं व्यसन असल्याचं समोर आलं आहे. ते तुरुंगातही अंमली पदार्थांची मागणी करत असून तुरुंगातील जेवन नाकारत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर एका तुरुंग अधिकाऱ्याने सांगितलं की, स्वतःचे किंवा इतरांचे नुकसान होऊ नये म्हणून अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुस्कान आणि साहिल यांच्याकडून अंमली पदार्थांच्या मागणी दरम्यान दोघांनीही जेवण नाकारत आहेत.