Kalim Ulla Khan Mango Man : भारतात आता आंब्याचा मोसम सुरू झालाय. बाजारात आंब्यांच्या पेट्या दिसू लागल्या असून विविध राज्यातून येणाऱ्या आंब्यांना प्रचंड मागणी असते. आंबा बागायतदारांना तर या काळात मोठा मान सन्मान असतो. विविध प्रकारचे, जातीचे आंबे या दिवसांत चवीने खालले जातात. पण एकाच झाडाला विविध प्रकारचे आंबे लागल्याचे तुम्ही कधी पाहिलंय काय? पण ही किमया कलीम उल्ला खान यांनी करून दाखवली आहे. म्हणून त्यांना मँगो मॅन असंही संबोधलं जातं. भारतात आंब्याचा मोसम सुरू झाला की कलीम उल्ला खान यांच्याविषयीही चर्चा वाढते.

कलीम उल्ला खान यांनी एकाच झाडावर ३०० जातींचे आंबे पिकवले आहेत. निसर्गातील ही अनोखी किमया केल्यामुळेच त्यांना भारतातील मँगो मॅन म्हणून संबोधलं जातं. उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी मलिहाबाद येथे त्यांनी १२० वर्षांच्या एका आंब्याच्या झाडावर हा अनोखा आणि चमत्कारीक प्रयोग केला आहे. या अवाढव्य दिसणाऱ्या झाडावर ३०० हून अधिक प्रकारचे आंबे आहेत, यामध्ये प्रत्येकाची चव, रंग आणि आकार वेगळा आहे. त्यांनी बागायतदार आणि आंबाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.

१७ व्या वर्षांपासून झाडांचं संगोपन

खान यांनी अगदी वयाच्या १७ व्या वर्षापासून झाडांचं संगोपन राखायला सुरुवात केली. ते सतत झाडांबाबतीत प्रयोगशील राहिले. नवं काहीतरी उत्पादित करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. सुरुवातीच्या काळात आंबे तसेच इतर फळांची कलमे करण्यास सुरुवात केली. वर्षानुवर्षांची मेहनत आणि कौशल्यामुळे त्यांना त्यांच्या कलाकुसरीत निपुणता मिळाली आणि कलमबाजीत ते प्रसिद्ध झाले. २००८ मध्ये खान यांच्या बागायतीच्या आवडीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्यांना भारतातील एक प्रमुख नागरी सन्मान असलेला पद्मश्री पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार बागायती व्यवसायातील त्यांच्या प्रचंड योगदानामुळे मिळाला होता.

आंब्यांना दिग्गजांची नावे

कलीम उल्ला खान यांच्या आंब्याच्या जातींना प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावरून नावे देण्यात आली आहेत. भारतात आंब्याच्या विविध जाती आहेत – तोतापुरी, लंगडा, दशहरी, फाजली, चौसा, सफेदा, रतोल, मालदा आणि इतर अनेक. पण खान यांनी एक पाऊल पुढे जाऊन त्यांच्या कलम केलेल्या आंब्यांच्या जातींना प्रमुख व्यक्तींची नावे दिली. त्यांची पहिली खास जात, ‘ऐश्वर्या’, प्रत्यक्षात १९९४ मध्ये जेव्हा तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा बॉलीवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चनच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं. तसंच, खान यांनी ‘अनारकली’, ‘सचिन तेंडुलकर’ आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या इतर दिग्गजांची नावंही आंब्यांना दिली आहेत.

शेताततून शिक्षणाचा अर्थ कळला

कलीम उल्ला खान यांचं अवघे सातवीपर्यंत शिक्षण झालं आहे. पण शाळा अर्धवट सोडली तरीही त्यांच्या शिक्षणाची गोडी संपली नव्हती. त्यांना शाळेचा द्वेष होता, पण शेतातच त्यांना शिक्षणाचा अर्थ कळला. खान यांनी वयाच्या १७ व्या वर्षी त्यांच्या वडिलांसोबत त्यांच्याच नर्सरीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांनी लावलेले झाड पावसात मरून गेले तरी त्यांनी कधीही आशा सोडली नाही. त्याऐवजी, ते दृढ राहिले, प्रत्येक अपयशातून शिकत राहिले आणि या प्रक्रियेत त्यांची कला परिपूर्ण करत राहिले.