पीटीआय, इस्लामाबाद

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मंगळवारी भेट झाली. इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जयशंकर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान शरीफ यांनी आपल्या निवासस्थानी मंगळवारी रात्री ‘एससीओ’च्या सदस्य राष्ट्रांच्या शिष्टमंडळांच्या नेत्यांसाठी मेजवानी आयोजित केली. त्यावेळी झालेल्या या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करून अभिवादन केले.

त्यापूर्वी, दुपारी साडेतीनच्या सुमाराला इस्माबादजवळील नुर खान हवाई तळावर जयशंकर यांचे विमान उतरले. तेथे पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. ‘एससीओ’ परिषदेसाठी पाकिस्तानात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जयशंकर बुधवारी या परिषदेत भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.

हेही वाचा >>>Air India : एअर इंडियाच्या विमानासह सात विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विमानाचे आपत्कालीन लँन्डिंग!

जयशंकर यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून पाकिस्तानात दाखल झाल्याची माहिती दिली. त्याबरोबर त्यांनी लहान मुले आणि अधिकाऱ्यांबरोबरची छायाचित्रेही सामायिक केली. ते इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी, आपण ‘एससीओ’च्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असल्याचे भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. एससीओ परिषद १५ आणि १६ ऑक्टोबरला होत आहे.

नऊ वर्षांनंतरचा दौरा

जयशंकर यांच्या रूपाने भारताचे परराष्ट्रमंत्री नऊ वर्षांनंतर पाकिस्तानला गेले आहेत. यापूर्वी डिसेंबर २०१५मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज इस्लामाबादला गेल्या होत्या. त्यावेळी जयशंकर यांचा परराष्ट्र सचिव या नात्याने स्वराज यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात समावेश करण्यात आला होता. स्वराज ८ आणि ९ डिसेंबर २०१५ हे दोन दिवस अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ह्यहार्ट ऑफ एशियाह्ण या परिषदेला उपस्थित राहिल्या होत्या. स्वराज यांच्या भेटीनंतर दोनच आठवड्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूलहून परत येताना लाहोरला भेट देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते.