नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विरोधी पक्षांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत १७ व १८ जुलै रोजी बेंगळुरूमध्ये महाआघाडीची बैठक आयोजित करण्याचा निर्णय सोमवारी काँग्रेसच्या पुढाकाराने घेण्यात आला.
महाराष्ट्रातील राजकीय नाटय़ानंतर विरोधकांच्या ऐक्यासाठी होणारी दुसरी बैठक लांबणीवर टाकण्यात आली असल्याचे विधान जनता दलाचे (सं) प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी केल्यामुळे विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. विरोधकांकडून बैठक रद्द झाली तर भाजपच्या मनसुब्यांना यश आल्याचा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीची पुनरावृत्ती इतर राज्यांमध्येही करण्याचा प्रयत्न भाजप करेल. ही संधी भाजपला न देता भाजपेतर पक्ष एकत्र असल्याचे स्पष्ट चित्र मतदारांसमोर ठेवले पाहिजे, असे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी तसेच, पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे होते.
काँग्रेस नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर विरोधी पक्षांमधील संदिग्धता दूर करण्यासाठी महाआघाडीची बैठक लांबणीवर वा रद्द न करता बेंगळुरूमध्येच १७ व १८ जुलैला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही माहिती काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ट्वीटद्वारे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच महाआघाडीची बैठक हिमाचल प्रदेशमधील सिमल्यामध्ये न घेता कर्नाटकमध्ये बेंगळुरूमध्ये १३ व १४ जुलै रोजी होईल, असे घोषित केले होते. पाटण्यामध्ये २३ जून रोजी महाआघाडीची पहिली बैठक झाली होती.
मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, लालूप्रसाद यादव, एम. के. स्टॅलिन आदी सर्व विरोधी पक्षनेत्यांनी शरद पवार यांच्याशी संवाद साधून भाजपविरोधात पवारांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. आगामी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक असून तिथे भाजपचा पराभव झाला तर, फोडाफोडीचे राजकारण अधिक वेगाने होण्याची भीती असून त्याविरोधात एकजुटीने उभे राहिले पाहिजे, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. बेंगळुरूमधील बैठकीमध्ये विरोधकांचा अजेंडा बदलण्याची शक्यता असून प्रामुख्याने भाजपच्या आगामी रणनितीवर मात करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार असल्याचे समजते.
बिहारमध्ये नितीशकुमारांच्या हालचाली!
बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी परिस्थिती नजिकच्या भविष्यात निर्माण होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर नितीशकुमार यांच्या जनता दल (सं)मध्येही फूट पडेल, असा गर्भित इशारा भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी दिला. त्यानंतर, महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी पक्षाच्या सर्व आमदारांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत युती करणाऱ्या राष्ट्रीय लोकदलालाही भाजप लक्ष्य करण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. महाआघाडीच्या दुसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा दावाही चौधरींनी केला.
संयुक्त जनता दलात बंडाचे वारे; भाजप नेत्याचा दावा
बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलामध्ये (जेडीयू) बंडाचे वातावरण असल्याचा दावा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी सोमवारी केला. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते नितीशकुमार देशपातळीवर विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्नशील असतानाच, मोदी यांनी त्यांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर प्रतिक्रिया देताना मोदी यांनी जेडीयूमध्येही फूट पडू शकते असे सांगितले.
जेडीयूचे अनेक आमदार आणि खासदार भाजप आणि इतर पक्षांच्या संपर्कात असून त्या पक्षामध्ये कधीही फूट पडू शकते असे सुशीलकुमार मोदी म्हणाले. या नेत्यांना नितीशकुमार यांचे मुख्यमंत्रीपदाचे वारसदार म्हणून तेजस्वी यादव मान्य नाहीत तसेच संयुक्त विरोधकांचे नेते म्हणून काँग्रेसचे राहुल गांधीही मान्य नाहीत असा दावा मोदी यांनी केला. जेडीयूच्या बंडखोरांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना मोदी यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही. मात्र, नितीशकुमार यांनी पक्षाच्या दारावर लोटांगण घातले तरी त्यांना प्रवेश दिला जाणार नाही असे ते म्हणाले.