महेश सरलष्कर, सोनमर्ग
लडाखमधील कारगिल, लेह आणि द्रास या देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील भूप्रदेशाशी बारामाही लष्करी तसेच आर्थिक संपर्क कायम ठेवू शकणाऱ्या जोजिला बोगद्याचे बांधकाम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या बोगद्याचे काम प्रगतीपथावर असून भूषृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी त्याची मंगळवारी पाहणी करणार आहेत.
सोनमर्ग ते लेह हा मार्ग हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे वाहतुकीसाठी बंद होतो. त्यामुळे कारगिल, द्रास आणि लेह भागांत सैन्य तैनात करणे व त्यादृष्टीने लष्करी वाहतुकीसाठी अन्य जवळचा मार्ग उपलब्ध नाही. पर्यायी मार्ग खर्चिक असून तो चीन व पाकिस्तान सीमांच्या नजिक असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जोजिला बोगदा बनवला जात आहे. जोजिला बोगदा समुद्रसपाटीपासून ११ हजार ५८७ फुटांवर बांधला जात असलेला आशियातील १४.१५ किमीचा सर्वात मोठा बोगदा असेल, अशी माहिती मेघा इंजिनीअरिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. एस. कम्बो यांनी पत्रकारांना दिली.
लडाखमधील राष्ट्रीय महामार्ग १ वर झेडमोड ते जोजिला या एकूण ३३ किमीच्या पट्टय़ात दोन बोगदे होणार आहेत. झेडमोड बोगदा ६ किमी व जोजिला बोगदा १४.५ किमीचा असेल व त्यासाठी अनुक्रमे २३०० कोटी व ४६०० कोटींचा असा एकूण ६९०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. झेडमोड बोगदा डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. या बोगद्यांमुळे १८.१५ किमीचा महामार्ग विकसीत होईल. या बोगद्यांसाठी नवे ऑस्ट्रेलियन बोगदा निर्मिती तंत्रज्ञान अवलंबिण्यात आल्याची माहितीही कम्बो यांनी दिली.
सोनमर्ग नवे गुलमर्ग ?
आत्ता ३३ किमीचे अंतर कापण्यासाठी साडेतीन तास लागतात, पण बोगदा पूर्ण झाल्यावर हा प्रवास फक्त १५ मिनिटांचा असेल. राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत विकास महामंडळाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. श्रीनगर ते बालटल असा महामार्गही बांधला जात असून जोजिला बोगदा बांधून पूर्ण झाल्यानंतर जम्मू काश्मीर व लडाख अशा तीनही भूप्रदेशाचा वेगाने विकास होऊ शकेल. हिवाळ्यात सोनमर्ग सहा महिने बंद असते. इथले लोक श्रीनगरमध्ये वास्तव्य करतात पण जोजिला बोगदा कार्यान्वित झाल्यानंतर सोनमर्गशी बारामाही संपर्क ठेवणे शक्य होईल व गुलमर्गप्रमाणे सोनमर्गही हिवाळ्यातील पर्यटनस्थळ म्हणून विकसीत होऊ शकेल, असा दावाही करण्यात आला आहे.
जोजिलाचे महत्त्व लेह व लडाखला श्रीनगर व उर्वरित देशाशी जोडणारा श्रीनगर ते लेह हा महामार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध नसतो. बर्षवृष्टीमुळे हा महामार्ग ६ महिने बंद होतो. त्यामुळे लडाख भूप्रदेशाचा सहा महिने उर्वरित देशाशी संपर्क तुटलेला असतो. जोजिला व झेडमोड बोगद्यांमुळे यासमस्येवर कायमस्वरुपी मात करता येणार आहे.