भारतीय जनता पार्टीची सत्ता असणाऱ्या काही राज्यात गोमांस खाण्यावर बंदी लादली आहे. असं असताना मेघालयमधील भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाने मोठं विधान केलं आहे. होय, मी बीफ खातो. आम्हाला बीफ खाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. बीफ खाणं हा येथील लोकांच्या जीवनशैलीचा भाग आहे, असं विधान मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांनी केलं आहे. ते ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
मेघालयमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांनी गुरुवारी सांगितले की, राज्यात गोमांस खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मीही गोमांस खातो. गोमांस खाणं ही येथील लोकांची जीवनशैली आहे. त्यामुळे त्यावर कोणीही निर्बंध आणू शकत नाही.
यावेळी मावरी म्हणाले, “इतर राज्यांनी गोमांस बंदीबाबत मंजूर केलेल्या ठरावावर मी विधान करू शकत नाही. आपण मेघालयात आहोत, येथे सगळे गोमांस खातात आणि यावर कोणतेही निर्बंध नाहीत. होय, मीही बीफ खातो. मेघालयात कोणतीही बंदी नाही. ही लोकांची जीवनशैली आहे. याला कोणीही रोखू शकत नाही. भारतात असा कोणताही नियम नाही. काही राज्यांनी काही कायदे केले आहेत. मेघालयात आपल्याकडे कत्तलखाना आहे, जिथे प्रत्येकजण गाय किंवा डुक्कर घेऊन येतो. येथून बाजारात मांस आणलं जातं. हे पौष्टीक असल्याने लोकांना गोमांस खाण्याची सवय आहे.”
हेही वाचा- “शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटत होती, कारण…”, बावनकुळेंचं थेट विधान!
आगामी मेघालय विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी बाजी मारणार असल्याचा विश्वासही अर्नेस्ट मावरी यांनी व्यक्त केला. तसेच भाजपा ही ख्रिश्चनविरोधी आहे, हा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. भाजपा ख्रिश्चनविरोधी आहे, हा राजकीय अपप्रचार असल्याचंही त्यांनी म्हटलं.