मागील काही दिवसांपासून जगभरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. टर्की, चीन, नेपाळनंतर आज पहाटे ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. दरम्यान, मणिपूरनंतर आता मेघायलमध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे. ईशान्य भारतात गेल्या पाच तासांतला हा दुसरा भूकंप आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ट्वीट करत याबाबत माहिती दिली.
हेही वाचा – Tajikistan Earthquake : ताजिकिस्तानमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का; तीव्रता ४.३ रिश्टर स्केल
ईशान्य भारत भूकंपाने हादरला
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मेघालयमधील तुरा येथे आज पहाटे ७ वाजताच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. तत्पूर्वी पहाटे २.४६ च्या सुमारास मणिपूरमधील नोनी जिल्ह्यातही भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या २५ किमी खोलीवर होता.
ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचा धक्का
दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाची तीव्रता अनुक्रमे ४.३ आणि ४.१ रिश्टर स्केल मोजण्यात आली होती. या भूंकपाचे केंद्र ताजिकिस्तान-अफागाणिस्तान सीमेजवळ होते.