मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स भागात एका कोळसा खाणीत १३ मजूर अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफची टीम प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांना वाचवणे हे अवघड असून सध्या इथली परिस्थिती खूपच कठीण आणि जटील बनली आहे, असे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी स्पष्ट केले आहे.


या खाणीत भरलेले पाणी उपसण्यासाठी आम्ही पंपिंगचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहोत. मात्र, पाण्याचा दाब इतका जास्त आहे की, पाण्याची पातळी कमी करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही बराच प्रयत्न करीत आहोत मात्र पाण्याची पातळी खूपच अधिक आहे. ज्या दिवशी ही घटना घडली. त्याच दिवशी मी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती, असेही संगमा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


गेल्या गुरुवारी (दि.१३) लुमथरी भागातील तीन स्थानिक रहिवाशांसहित एकूण १३ लोक कोळशाच्या खाणीत अडकले होते. खण कामगारांनी तीन-चार दिवसांपूर्वीच उत्खनन सुरु केले होते, त्यादरम्यान ही दुर्घटना घडली असावी असे सांगण्यात येत आहे. त्याच दिवसापासून येथे अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अद्याप बचाव कार्याला यश आलेले नाही. एनडीआरएफच्या ६० पेक्षा अधिक सदस्यांची टीम घटनेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती.