पेट्रोल आणि डिझेल हे आजच्या काळात सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे विषय झाले आहेत. त्यातही नोकरदार आणि सामान्यांसाठी तर हा महिन्याचा अर्थसंकल्प शिलकीचा की तुटीचा? हे ठरवणाराच प्रश्न आहे! विशेषत: गेल्या महिन्याभरात पेट्रोल आणि डिझेलमुळे सामान्यांना जेवणापेक्षाही पेट्रोलवर जास्त खर्च करावा लागत असल्यामुळे या पेट्रोलनं डोळ्यात पाणी आणल्याचा त्रागा सगळेच करताना दिसत आहेत. गेल्या महिन्याभरात तब्बल १० वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांवरही सामान्यांची मोठ्या प्रमाणावर नाराजी असताना भारतातील एका राज्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनुक्रमे ५ आणि ७ रुपयांनी कमी करण्याची कमाल करून दाखवली आहे! त्यांना हे कसं शक्य झालं?
मेघालयची उलटी गंगा!
तुम्हाला उत्सुकता असेल की भारतातलं असं कोणतं राज्य आहे? तर ते राज्य आहे मेघालय! भारतातले आजचे पेट्रोलचे सरासरी दर तब्बल ९२ ते ९५ रुपयांच्या घरात आहेत. तर डिझेलचे सरासरी दर ८७ ते ९० रुपयांच्या घरात आहेत. पण मेघालयने मात्र पेट्रोल इतर राज्यांपेक्षा साधारण ५ रुपये कमी म्हणजेच ८५.८६ रुपये दराने, तर डिझेल ७ रुपयांनी कमी म्हणजेच ७९.१३ रुपये प्रतिलिटर दराने विक्री करण्याची घोषणा केली आहे. भारतभर पेट्रोलचे भाव दररोज वाढत असताना मेघालयने मात्र ते उलट कमी केले आहेत!
In addition to the previous rebate of Rs. 2 per litre, Government has decided to reduce the petrol price further by Rs.5.4 per litre and diesel by Rs. 5.1 per litre to offer relief to consumers of #Meghalaya with slight variations in other Districts.
— Conrad Sangma (@SangmaConrad) February 16, 2021
हे कसं शक्य झालं?
गेल्या दोन दिवसांपासून मेघालयमधल्या वाहतूकदारांच्या संघटनेने संप पुकारला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या नाहीत, तर हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील दिला होता. या पार्श्वभूमीवर मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरे़ड संगमा यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून लावण्यात येणारा व्हॅट कमी करण्याचं पाऊल उचलण्यात आलं आहे. यामध्ये पेट्रोलवर लावण्यात येणारा ३१.६२ टक्के व्हॅट २० टक्क्यापर्यंत किंवा १५ रुपयांनी यातील जी रक्कम जास्त असेल, ती कमी करण्यात आली आहे. त्यासोबतच डिझेलवर लावण्यात आलेला येणारा २२.९५ टक्के व्हॅट १२ टक्क्यांवर किंवा ९ रुपयांनी, यातील जी रक्कम जास्त भरेल ती कमी करण्याचा समावेश आहे.
आपलं काय होणार?
दरम्यान, मेघालयने किंमती कमी केल्यामुळे आता भारतातील इतर राज्यांवर देखील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणून त्या कमी करण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरेड संगमा हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले दिवंगत पी. ए. संगमा यांचे पुत्र आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रचार मोहिमा देखील राबवल्या आहेत. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचा आता महाराष्ट्राच्या सत्तेत देखील वाटा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील किंमती कमी होण्याच्या अपेक्षा व्यक्त होऊ लागल्या आहेत. जर मेघालयला हे जमू शकतं, तर महाराष्ट्राला का नाही? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग नवव्या दिवशी वाढ; जाणून घ्या सध्याचे दर