मेहबुबा मुफ्ती यांचे मत
बुद्धिमंतांची पुरस्कार वापसी म्हणजे भाजपने आरोप केल्याप्रमाणे सुनियोजित कृत्य नसून ते लोकशाहीचे सौंदर्य आहे, असे मत जम्मू काश्मीरमधील भाजपचा सत्तेत सहकारी पक्ष असलेल्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याने असहिष्णुतेच्या चर्चेला पुन्हा एक नवीन मुद्दा मिळाला आहे. आयसिस व अल कैदासारख्या धोकादायक संघटनांना दूर ठेवण्यासाठी भारताने पाकिस्तानशी चर्चा केलीच पाहिजे, असे सांगून त्या म्हणाल्या की, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान या शेजारी देशांशी मैत्रीचे संबंध हिताचेच आहेत.
‘आज तक अजेंडा’ या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, भारतीय लोकशाहीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, कारण आपण त्यात निषेध नोंदवू शकतो. भारत हा विविधतेने नटलेला एक वेगळाच देश आहे, तेच त्याचे बलस्थान आहे.भाजपभोवतीच्या कुंपणावरचे काही घटक ढोंगी हिंदुत्ववादाचा पुरस्कार करीत असून त्याच्या जोडीला बेगडी राष्ट्रवाद आणत आहेत, त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत.
पुरस्कार वापसी हे सुनियोजित कृत्य आहे, या आरोपाबाबत त्यांनी सांगितले की,आपल्याला प्रगतीकडे वाटचाल करायची असेल तर असहिष्णुतेने देशाचे भले होणार नाही.
गोमांस खावे की खाऊ नये याबाबतच्या चर्चेवर त्यांनी सांगितले की, ती चर्चाच आजारी मानसिकतेचे द्योतक आहे. एककीडे डाळ महाग होत असताना आपण गोमांस बंदीची चर्चा करतो हा विरोधाभास आहे. सर्व धर्मानी देशाच्या वाढीस हातभार लावला आहे. हिंदूधर्माने सहिष्णुता शिकवली, इस्लामने समानता तर ख्रिश्चन धर्माने करूणेचा संदेश दिला.
आयसिसबाबत त्या म्हणाल्या की, आयसिस हा बंदी घातलेला गट आहे, काश्मीरमध्ये त्याचा धोका नाही. आयसिस किंवा पाकिस्तानचे झेंडे काश्मीरमध्ये फडकतात, पण ती प्रसिद्धी मिळवण्याची युक्ती असते. आयसिस इस्लामचे प्रतिनिधित्व करीत नाही. ते मुस्लिमांना मारत आहेत, अत्याचारांची शिकवण देत आहेत.
काश्मीरमधला इस्लाम शेजाऱ्यांशी शांततेने राहण्याची शिकवण देतो, आयसिसचा काश्मीरला धोका नाही. आयसिसच्या कृत्यांना प्रसारमाध्यमांनी फार महत्त्व देऊ नये. १५ ऑगस्टला एका ठिकाणी काही लोक जमले व त्यांनी पाकिस्तान व आयसिसचा झेंडा फडकावला त्याला प्रसिद्धी मिळू नये म्हणून आम्ही खासगी वाहिन्यांना दूर ठेवले होते. त्यानंतर बऱ्याच चर्चा झाल्या व लोकांना सगळे माहिती व्हायला हवे असे आम्हाला ऐकवण्यात आले.

Story img Loader