Mehboob Ali Samajwadi Party MLA Muslim Population Rising Remark : उत्तर प्रदेशमधील अमरोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व समाजवादी पार्टीचे नेते महबूब अली यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महबूब अली म्हणाले, “मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील भाजपाचं शासन लवकरच संपेल”. सपाने आयोजित केलेल्या संविधान सन्मान बैठकीत ते बोलत होते. या बैठकीतून महबूब अली यांनी भाजपाला इशारा दिला आहे की “लवकरच तुमचं राज्य संपुष्टात येणार आहे. मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. आता आम्ही सत्तेत येणार आहोत. जे लोक आपला देश जाळत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारतातील जनता आता जागरुक झाली आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून तसा कौल दिला आहे. २०२७ च्या आधीच तुमचं (भाजपा) सरकार जाईल”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सपा आमदाराच्या या वक्तव्यानंतर भाजपानेही सपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माजी खासदार व उत्तर प्रदेश भाजपाचे सरचिटणीस सुब्रत पाठक म्हणाले, सपा आमदाराच्या या वक्तव्यामुळे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. सपाने त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. अखिलेश यादव (समाजवादी पार्टीचे प्रमुख) यासाठीच हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का? एकाच समुदायाच्या इच्छा पूर्ण होवोत यासाठीच सगळं काही चाललंय का? अखिलेश यादव यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की देशातील जनता आता सुज्ञ झाली आहे. देश आता बदलला आहे. हिंदूंनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं आहे. योगी आदित्यनाथ यांना दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केलं आहे.

हे ही वाचा >> CJI Chandrachud : “Yeah म्हणायला हे कॉफी शॉप नाही”, सरन्यायाधीश चंद्रचुडांनी वकिलाला झापलं; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

भाजपाकडून जशास तसं प्रत्युत्तर

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी देखील सपा आमदार महबूब अली यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “इंडिया आघाडी आणि समाजवादी पार्टीचं धोरण संशयास्पद आहे”. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “अमरोहाचे सपाचे आमदार महबूब अली यांनी संविधान सन्मान बैठकीत म्हटलं आहे की लवकरच योगींचं शासन संपेल, कारण मुस्लिमांची संख्या वाढली आहे. ते नेहमी ८०:२० वरून वक्तव्ये करत असतात. ते म्हणतात, देशात ८० विरुद्ध २० अशी स्थिती आहे. हेच त्यांचं प्रेमाचं दुकान (मोहब्बत की दुकान) आहे का? हे लोक संविधान समर्थक आहेत असं वाटतं का? त्यांची योजना धर्मनिरपेक्ष आहे? खरंतर त्यांची योजना स्पष्ट आहे. हिंदूंमध्ये फूट पाडा आणि मुस्लीम व्होटबँक मजबूत करा. याच धोरणावर त्यांचं राजकारण टिकून आहे. अखिलेश यादव म्हणतात की मठाधीपतींचं (योगी आदित्यनाथ) माफिया राज चालू आहे. तर राहुल गांधी राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमावर टीका करतात. दुसऱ्या बाजूला महबूब अली हिंदू-मुस्लीम राजकारण करतायत. यावरून त्यांचा अजेंडा स्पष्ट होतो”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mehboob ali sp mla says muslim population rising to end bjp rule asc